नागपूर : सर्वोच न्यायालयाच्या आदेशानंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्याने सर्व राजकीय पक्ष तयारी लागले आहेत. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची नागपूर महापालिका निवडणुकी संदर्भात आढावा बैठक पार पडली. यात निवडणुकी संदर्भातील सर्व अधिकार हे माजी गृहमंत्री व ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्याकडे देण्यात आले आहे. पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला सामोर जात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची कसोटी लागणार आहे. या पक्षाचा एक नगरसेवक आहे. या बैठकीत निवडणुकीचे सर्व अधिकार देण्याचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांनी अनुमोदन देत एकमताने हा ठराव पारित करण्यात आला.बैठकीला माजी मंत्री रमेश बंग, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार दिनानाथ पडोळे, किशोर गजभीये, माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, निरीक्षक मुनाज शेख यांच्यासह प्रदेश पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, शहर कार्यकारणीचे पदाधीकारी मोठया संख्येने उपस्थीत होते.
नागपूर शहरात गेल्या १५ वर्षापासून भाजपाची सत्ता असून त्यांनी गवागवा केलेल्या अनेक योजना या सपशेल अपयशी ठरल्या आहेत. यात प्रामुख्याने ओबीसीडब्ल्यूच्या माध्यमातून शहरात चोवीस तास पाणी पुरवठा करण्यात येणार होते. परंतु शहरातील आजही अनेक असे भाग आहेत की जेथे टॅकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. चोवीस तास पाणी मिळावे म्हणून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आलास परंतु नागरिकांना २ ते ३ तासाच पाणी आहेत. तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. दुसरीकडे पाणी पट्टीमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली असल्याचे अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
शहरातील कचरा उचलण्याचे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. परंतु अनेक भागात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. भांडेवाडी येथील डंम्पिंग यार्डचा प्रश्न अद्यापही निकाली लागला नाही. मालमत्ता कर मध्ये मोठया प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे शहरातील अनेक रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागिरक त्रस्त आहेत. पावसाळयात सीताबर्डीसारखे महत्वाच्या ठिकणी पूर येतो. यासह अनेक भागात पावसाळी पाण्याच्या निचारा करणारी यंत्रणा नसल्याने रस्त्यावरुन पाणी वाहते. यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. हे प्रश्न घेवून सर्व पदाधिकाऱ्यांनी घराघरापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यासाठी सुध्दा एक कालबध्द कार्यक्रम राबविण्याची सुचनाही अनिल देशमुख यांनी यावेळी केली.
किशोर गजभिये प्रदेश उपाध्यक्षपदी
माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यांचा अनुभव लक्षात घेतला पक्ष संघटनेत त्यांना महत्वाची जवाबदारी देण्याचा निर्णय झाला होता.