लोकसत्ता टीम

यवतमाळ : ‘सत्ताधाऱ्यांनो आर्य वैश्य समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी त्वरित ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करा, नाहीतर परंपरागत मतांवर पाणी सोडा’, असा निर्वाणीचा इशारा देत ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’च्या वतीने स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला मुंबई येथे आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाविषयी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार लाभसेटवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ च्या वतीने मागील १० वर्षांपासून राज्य शासनाकडे ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापनेची मागणी करण्यात येत आहे. पण शासन यास प्रतिसाद देत नाही. राज्यातील आर्य वैश्य (कोमटी) समाज हा भाजपचा परंपरागत मतदार म्हणून ओळखल्या जातो. २०१४ साली राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर या समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या. समाजाच्या वतीने नंदकुमार लाभसेटवार आणि ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार यांनी ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र’ ची स्थापना करून शासनाकडे ‘आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ’ स्थापनेची मागणी केली.

आणखी वाचा-‘अंगणवाडी सेविकांमार्फत महिलांना रवी राणांच्या धमक्‍या’, भाजपच्या नेत्‍याचा आरोप

या मागणीच्या पूर्ततेसाठी अनेकवेळा आंदोलनही केले. तरी शासन न्याय देत नसल्यामुळे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ५ मार्च २०२४ रोजी थेट मंत्रालयासमोरच सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्नही केला. तरीही महायुती सरकार न्याय देण्यास तयार नाही. त्यामुळे आता१५ ऑगस्ट रोजी संघर्ष समितीच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे इशारा आंदोलन करण्यात येणार आहे. आर्य वैश्य समाजाच्या वतीने सत्ताधाऱ्यांना ‘त्वरीत आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, मगच मतं मागायला या. नाहीतर मतांची अपेक्षा ठेवू नका,’ असा इशारा देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्यवैश्य महामंडळ निर्माण न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत एकूण १६ विधानसभा मतदारसंघात संघर्ष समितीच्या वतीने ‘आर्य वैश्य समाज मतदार जनजागृती अभियान’ राबवून ‘एक ही भूल, कमल का फूल’ असा नारा देत भाजपला मतदान न करण्याचे आवाहन समाजाला करण्यात येणार आहे, असे संघर्ष समितीने स्पष्ट केले. समाजबांधवांनी या आंदोलनात समाविष्ट व्हावे, असे आवाहन नंदकुमार लाभसेटवार, ब्रह्मानंद चक्करवार, राजकुमार मुत्तेपवार, नरेश ऱ्याकावार, संतोष रायेवार, गजानन दमकोंडवार आदींनी केले आहे.