नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर ६ ऑक्टोबर २०२५ रोजी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरुममध्ये जोडा फेकण्याचा गंभीर प्रयत्न केला. या घटनेनंतर देशभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, संबंधित वकिलाविरुद्ध विविध कायदेशीर कारवाई सुरू आहे. घटना घडली त्या दिवशी, दिल्लीतील वकील राकेश किशोर यांनी कोर्ट नंबर १ मध्ये सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आपले जोडे काढून सरन्यायाधीशांवर फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ‘सनातन धर्माचा अपमान सहन होणार नाही’ अशा घोषणा दिल्या.
घटनेनंतर, संबंधित वकिलाविरुद्ध दिल्लीतील बार काउंसिल ऑफ इंडियाने तात्काळ निलंबनाची कारवाई केली. त्याच्या वर्तनाला न्यायालयाच्या सन्मानाशी सुसंगत नसल्याचे बार काउंसिलने म्हटले आहे. त्याचप्रमाणे, पंजाब पोलिसांनी सोशल मीडियावर सरन्यायाधीशांवर जातीय टिप्पणी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली असून, १०० हून अधिक सोशल मीडिया खात्यांची तपासणी सुरू आहे. महाराष्ट्रातील नवी मुंबईतील न्यू पनवेल पोलिसांनी देखील सरन्यायाधीश गवई यांच्यावरील जातीय व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘खूप धक्का बसला’ असे सांगितले, परंतु या घटनेला ‘विसरलेला प्रकरण’ म्हणून संबोधले.
त्यांनी न्यायालयाच्या कार्यवाहीवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी कोर्टाच्या अधिकाऱ्यांना विचलित होऊ नये, असे सांगितले. या घटनेनंतर विविध वकील संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मात्र महाराष्ट्र शासन याप्रकरणी निष्क्रिय असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सरन्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र असून त्यांचा सत्कारही महाराष्ट्र शासनाने केला, मात्र आता काहीही कारवाई केली जात नाही आहे.
मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश द्यावेत
सर्वोच्च न्यायालयात जोडा फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेवर महाराष्ट्र पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही, अशी तीव्र नाराजी माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, ही घटना केवळ सरन्यायाधीश गवई यांचा अपमान नाही तर लोकशाही, संविधाने आणि सर्वोच्च न्यायालयावर झालेला हल्लाही आहे. केंद्र व राज्य सरकार योग्य ती कार्यवाही करत नसल्यास यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. खोब्रागडे यांनी मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे की पोलिसांना आदेश देऊन एफआयर दाखल करून न्या. गवई यांच्याप्रती आदर दर्शवावा. त्यांनी नमूद केले की, पंजाब आणि कर्नाटका पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवले आहे, तर महाराष्ट्राने आतापर्यंत कारवाई का केली नाही, हा प्रश्न उभा राहतो.