लोकसत्ता टीम

वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील वेळा येथे स्व. बापूराव देशमुख सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला होता. मात्र त्याची अखेर लिलावात झाली आहे.

२८ वर्षांपूर्वी प्रा. सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वात या कारखान्याची उभारणी झाली होती. त्याची गाळप क्षमता २५०० मे. टनाची होती. मात्र पुरेसा ऊस पुरवठा न होणे, नियोजनाचा अभाव, कर्जाचा डोंगर यामुळे कारखान्याची घसरण सुरू झाली. राज्य सहकारी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जपूरवठा केला होता. कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने टाळे लागले. राज्य बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम नोव्हेंबर २०२३ अखेरीस १४१ कोटी ३७ लाख रुपये तर जिल्हा बँकेची ३३ कोटी पाच लाख रुपयावर पोहचली.

आणखी वाचा-बुलढाणा : ढीगभर ‘नोटा’ घेऊन कारने निघाले मात्र…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी अनेकवेळा लिलाव प्रक्रिया घेण्यात आली होती. मात्र बोली कमी तर कर्जाची रक्कम अधिक असल्याने लिलाव शक्य झाला नव्हता. कारखान्याची १८२ एकर जमीन तसेच असलेली मालमत्ता विकून राज्य बँकेने नव्याने लिलाव प्रक्रिया सुरू केली. राज्य बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी ही बाब जाहीर केली आहे. या लिलाव प्रक्रियेत निविदा भरण्यासाठी २७ डिसेंबर ते २५ जानेवारी असा कालावधी देण्यात आला होता. तर प्रत्यक्षात लिलाव प्रक्रिया राज्य बँकेच्या मुंबई कार्यालयात २९ जानेवारीस सकाळी अकरा वाजता सुरू होणार. मालमत्ता लिलावात गेल्यानंतर विकून येणारा पैसा हा राज्य बँकेचा असेल. त्यातून जिल्हा बँकेस काहीही मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. बँकेस या लिलावातून तरी अपेक्षित थकबाकी मिळणार काय, हा उत्सुकतेचा प्रश्न आहे.