उपराजधानीत रुग्णांची प्रतीक्षासूचीच नाही; जागतिक हृदय दिन विशेष

महेश बोकडे

नागपूर : मध्य भारतात केवळ नागपुरात हृदय प्रत्यारोपणासाठीचे तीन केंद्र मंजूर असून आणखी दोन प्रस्तावित आहे. त्यानंतरही येथे अत्यवस्थ रुग्ण हृदय प्रत्यारोपणाच्या नोंदीसाठीही पुढे येत नाही. त्यामुळे विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला (झेड. टी. सी. सी.) या रुग्णांची यादीच करता आली नाही. या प्रकाराने मध्य भारतात हृदय प्रत्यारोपण वाढणार कसे? हा प्रश्न अनुत्तरित आहे. २९ सप्टेंबरला जागतिक हृदय दिन असून त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.

मध्य भारतात पहिले हृदय प्रत्यारोपण केंद्र न्यू ईरा या खासगी रुग्णालयात काही वर्षांपूर्वी मंजूर झाले. येथे एक हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही झाली. त्यानंतर मात्र येथे या प्रत्यारोपणासाठी कुणी रुग्ण पुढे आला नाही. यानंतर नागपुरात

अर्नेजा रुग्णालय व मेडिट्रिना रुग्णालय अशी दोन नवीन खासगी हृदय प्रत्यारोपण केंद्राला शासनाची मंजुरी मिळाली. तर आता विवेका रुग्णालय आणि मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयाकडूनही हृदय प्रत्यारोपण केंद्रासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे प्रस्ताव गेले आहेत.

कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया विदर्भ शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. सुनील वाशीमकर म्हणाले, हृदयरोग तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार देशात एक हजारात ८ नागरिक हृदयविकाराच्या धक्क्याने दगावतात. या आजाराची अनेकांना माहिती नसते. हृदयविकार असलेल्या

प्रत्येक हजार रुग्णांतील ३ ते ४ जणांना हृदय प्रत्यारोपणाची गरज असते. हे प्रत्यारोपण वाढण्यासाठी मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान गरजेचे आहे.

न्यू ईरा रुग्णालयाचे संचालक डॉ. आनंद संचेती म्हणाले, नागपुरात करोनामुळे अवयवदानाची संख्या कमी झाली. परंतु दानदात्यांकडून उपलब्ध होणारे हृदय येथे कुणी गरजू रुग्ण हृदय प्रत्यारोपणासाठी तयार होत नसल्याने मुंबई, पुणे, चेन्नई, दिल्लीला पाठवावे लागतात. त्यातही तेथे गरजू रुग्ण आढळण्यासह हृदय पाठवण्याची सोय झाल्यास ते तेथे पोहचू शकते. अथवा हे हृदय वाया जाते. नागपुरात हे प्रत्यारोपण करणारे तज्ज्ञ डॉक्टर असून बाहेरच्या तुलनेत नागपुरात प्रत्यारोपणाचा खर्चही खूप कमी आहे. परंतु गरजू रुग्णांपैकी निवडक रुग्ण येथे शस्त्रक्रियेला तयार न होता इतर शहरात प्रत्यारोपणाला पसंती देतात. या विषयाबाबत जनजागृती वाढल्यास प्रत्यारोपण वाढू शकते. हा विश्वास नागरिकांत निर्माण करण्यासाठी समाजातील विविध घटकांसह सामाजिक संघटनांनी पुढे यावे.

भविष्यात प्रत्यारोपण वाढेल

नागपुरात विविध अवयव प्रत्यारोपणाबाबत शासकीय रुग्णालयांसह खासगी अवयव प्रत्यारोपण केंद्र वाढणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु हृदय प्रत्यारोपणाबाबत नागरिकांत अद्यापही जनजागृती नाही. हे रुग्ण विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राकडे नोंदणीसाठी येत नाही. त्यामुळे एकही रुग्णाची प्रतीक्षा यादी दिसत नाही. परंतु भविष्यात अवयवदानाबाबत जनजागृती वाढून नागपुरात मूत्रपिंड, यकृत, बुब्बुळासह हृदय प्रत्यारोपणही वाढण्याची आशा आहे.

– डॉ. संजय कोलते, सचिव, विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र (झेड.टी.सी.सी.), नागपूर.