अतिशय वेगाने निर्माणकार्यकरूनही उदासीनता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल कांबळे

नागपूर : अतिशय वेगाने व प्राथमिकता देऊन नव्या पोलीस आयुक्तालयाची भव्य अशी बहुमजली इमारत उभरण्यात आली. परंतु, ही इमारत अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. राज्य पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे सुसज्ज असे पोलीस आयुक्तालय तयार करण्यात आले आहे, हे विशेष.

 २६ मार्च २०१८ मध्ये या भव्य पोलीस आयुक्तालयाच्या बहुमजली इमारतीचे मोठय़ा थाटात भूमिपूजन झाले होते. तब्बल ९७ कोटी रुपये खर्चून चार एकर परिसरात  या प्रशस्त इमारतीचे बांधकाम करण्यात आले.  सध्या इमारतीमध्ये किरकोळ काम सुरू  आहे. पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्तांचे प्रशस्त असे कार्यालय तयार करण्यात आले आहेत. या इमारतीतून नागपूर पोलीस दलाची तीनही अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालये, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त कार्यालय, विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयाचासुद्धा कारभार चालणार आहे. यासोबत सहायक पोलीस आयुक्त पोलिस (प्रशासन), सहायक आयुक्त मुख्यालय कार्यालयेसुद्धा याच इमारतीत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासह पोलीस विभागातील अन्य महत्त्वाचे विभाग या पोलीस भवनात स्थानांतरित करण्यात येणार आहेत. याशिवाय, पोलीस मुख्यालयाचेही कामकाज याच प्रशस्त इमारतीमधून चालणार आहे. 

नियंत्रण कक्षाचा विस्तार होणार

नव्या इमारतीच्या तळमजल्यावरच अत्याधुनिक सुविधेसह पोलीस नियंत्रण कक्ष आहे. याच इमारतीतून संपूर्ण शहरातील पोलीस ठाण्यांशी सीआरओच्या माध्यमातून संपर्क ठेवण्यात येणार आहे.  मोठा स्टाफ तळमजल्यावरील कार्यालयात बसणार आहे. तसेच स्वागतकक्ष, आवक-जावक विभाग, पासपोर्ट विभाग, जेष्ठ नागरिक मदत कक्ष, पेंशन ब्रॅंच स्थापन करण्यात आली आहे.

भव्य पोलीस आयुक्त कार्यालय

बहुमजली इमारतीच्या सहाव्या माळय़ावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे कार्यालय तयार करण्यात आले आहे. डोळय़ात भरेल असे कार्यालयाचे निर्माण करण्यात आले आहे. तसेच सहआयुक्त अश्वती दोरजे यांचे प्रशस्त कार्यालय आहे.   तीनही अतिरिक्त आयुक्त कार्यालयांचासुद्धा सहाव्या माळय़ावरून कारभार चालेल. तिसऱ्या माळय़ावर कर्मचारी, चौथ्या माळय़ावर ९ एसीपी कार्यालये आणि पाचव्या माळय़ावर पोलीस उपायुक्त कार्यालयांचा कारभार चालणार आहे.

ग्रामीणचे अधीक्षकांचे स्वतंत्र कार्यालय

पूर्वी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय स्वतंत्र इमारतीत असावे, यासाठीचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयात पाठविण्यात आला होता. परंतु, सात मजली इमारतीत ग्रामीण पोलीस अधीक्षकांसाठी वेगळी आणि स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीणसाठी स्वतंत्र विंग तयार करण्यात आली आहे. अधीक्षक कार्यालयात जाण्याचा मार्गही वेगळा ठेवण्यात आला आहे. तसेच या इमारतीत अधीक्षकांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक (गृह) आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यालय राहणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Awaiting inauguration multi storey building commissionerate police ysh
First published on: 27-02-2022 at 02:00 IST