नागपूर : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी वर्धा मार्गावरील परसोडी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांशी फोनवरून काल रात्री झालेल्या चर्चेनंतर बच्चू कडू आणि शेतकरी नेते मुंबईला चर्चेसाठी गेले आहे. मात्र, आंदोलन सुरूच असून आज मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. परसोडी येथील मोकळ्या जागेत मांडव टाकण्यात आले आहे. तेथे शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यासाठी आज जरांगे पाटील पोहोचले.

यावेळी “सरकार जागे व्हा”, “शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी गेल्या ७५ वर्षांत सर्वांनी मिळून शेतकऱ्यांना लुटले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मिळवण्यासाठी सरकारविरोधात प्रतिडाव टाकला गेला आहे. सरकारला प्रतिडाव टाकून प्रतिउत्तर देण्याची गरज आहे, असेही जरांगे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी मंगळवारपासून नागपुरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा तिढा तिसऱ्या दिवशीही कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईत चर्चा करण्याचे ठरले असून आज माजी आमदार बच्चू कडू आणि इतर नेते मुंबईकडे रवाना झाले आहेत. आंदोलकांच्या शिष्टमंडळात बच्चू कडू, अजित नवले, महादेव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर यांच्या समावेश राहणार आहे. ही सर्व मंडळी आज दुपारी १.५५ मिनिटांनी नागपूर-मुंबई या विमानाने मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी काल रात्री साडेआठच्या सुमारास प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली.

त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून कडू यांची चर्चा झाली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचे चर्चेचे निमंत्रण स्वीकारले होते. तसेच रस्ते मोकळे करून नियोजित ठिकाणी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आधी आंदोलकांनी सरकारला दुपारी ४ वाजता चर्चेची वेळ दिली होती. पण, मंत्री उशिरा पोहोचले. त्यावरूनही आंदोलकांनी मंत्र्यांना फैलावर घेतले. न्यायालयाने आंदोलनाबाबत आदेश दिल्यानंतर तुम्ही चर्चेला आले यावरून हे सर्व राज्य सरकारने ठरवून केल्याचे दिसते. कर्जमाफी करणार असे आश्वासन दिले तरच या चर्चेला अर्थ आहे, असे आंदोलकांनी मंत्र्यांना स्पष्ट शब्दात सुनावले. दरम्यान, उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेत बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलकांना महामार्गावरून हटवण्याचे नागपूर पोलिसांना निर्देश दिले. परंतु, त्यानुसार आंदोलक पांजरा वळण मार्गावरून परसोडी येथील आंदोलनाच्या नियोजितस्थळी आले आहेत.