वर्धा: विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात होणारे महाएल्गार आंदोलन विविध गावातून निघत नागपूरला पोहचणार. वर्धा जिल्ह्यात त्यांचे उत्साहात स्वागत झाले. आंजी येथे युवा संघर्ष वाहिनीतर्फे मोटारसायकल रॅलीने त्यांना फिरवण्यात आले. यावेळी रात्रीचे बारा वाजले होते. मात्र तरीही गावातील बायांबापडे मोठ्या संख्येत रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे चित्र होते. संघर्ष वाहिनीचे किरण ठाकरे यांना सोबत घेत त्यांनी लोकांशी संवाद साधला. काही समजतात तसे हे एक दिवसाचे आंदोलन नाही. आता मागण्या मान्य झाल्याशिवाय परत फिरणे नाहीच. आश्वासनावर थांबणार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत थांबणार, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
यावेळी कडू उपस्थित युवा वर्गास पाहून स्पष्ट केले की तुमच्या बापाच्या घामाला दाम पाहिजे असेल तर स्वस्थ बसू नका. किरण ठाकरे यांनी शेतकरी नेते राकेशसिंग यांच्या नेतृत्वात दिल्ली सोनिपत येथे झालेल्या आंदोलनातील सहभाग नमूद करीत हे महाएल्गार पण यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. या भेटीत गावकऱ्यांनी आणलेला चिवडा कडू यांनी खात धन्यवाद दिले. काढा रे कच्चा चिवडा अन लागा कामाला, असे उदगार निघाले. शासनाच्या घोषणावरील लोकांचा विश्वास संपत चालला आहे. म्हणून ही आरपारची लढाई, असे कडू म्हणाले.
परिसरातील आंजी, चाका मजरा, सुकळी व अन्य गावातील लोकं रात्री साडे बारा पर्यंत कडू यांच्याभोवती जमा झाले होते. कडू हे स्वतः ट्रॅक्टर चालवीत असतांना स्थानिक युवकांना ट्रॅक्तरवर बसवून घेतात. त्यामुळे अधिकच जोश व्यक्त होत असल्याचे दिसून येते. चर्चा झाल्यावर हे सर्व कार्यकर्ते सुकळी गावी मुक्कामी होते. रात्री दोन वाजता निजानीज झाली. आज सकाळी परत रॅलीसाठी तयार झालेले किरण ठाकरे म्हणाले की कडू यांच्यासोबत आलेला ट्रॅक्टर जथा मोठ्ठा आहे. त्यात साधनसामुग्री असून तो झाकला असल्याने त्यातच कार्यकर्ते झोप घेतात. आज सकाळी पुढे निघणार. वर्धा जिल्ह्यात किसान अधिकार अभियानाने या आंदोलनात सक्रिय सहभाग देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही मोठ्या संख्येत यात आज सामील होणार,असे संघटना नेते अविनाश काकडे म्हणतात.
हे आंदोलन अधिक प्रभावी करणार. आज सकाळी १० वाजता पिपरी येथे महाएल्गारचे स्वागत, साडे दहा वाजता पवनार, कान्हापूर येथे, ११ वाजता सेलूत किसान अधिकार, महाविकास आघाडी व विविध संघटना सहभागी होत आहे. सव्वा अकरा वाजता महाबळ फाट्यावर प्रमुख कार्यकर्ते ट्रॅक्टर यात्रेचे स्वागत करीत सोबत निघणार आहेत. साडे अकरा वाजता खडकी या ठिकाणी सुदाम पवार यांच्या नेतृत्वात अनेक या यात्रेसोबत निघणार आहेत. बुटीबोरी येथे होणाऱ्या आंदोलनात आम्ही सक्रिय सहभाग देणार असल्याचे काकडे म्हणाले.
