अकोला : विशेष रेल्वे गाडीला मुदतवाढ मिळाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बडनेरा ते नाशिक रोड व नाशिक रोड ते बडनेरा या विशेष गाडीच्या प्रत्येकी ९२ फेऱ्या वाढवल्या आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला.
विदर्भातील बहुतांश तरुण नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबईची वाट धरतात. औद्योगिकदृष्ट्या विकसित नाशिक जिल्हा देखील आता रोजगाराच्या बाबतीत पुढे आला आहे. पश्चिम विदर्भातील असंख्य तरुण नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने नाशिक येथे राहतात. धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून देखील नाशिक हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. पुणे, मुंबईला जाण्यासाठीसुद्धा नाशिक हे मध्यवर्ती ठिकाण ठरते. त्यामुळे नाशिकला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची प्रचंड गर्दी असते.
नियमित रेल्वे गाड्यांचे आरक्षण अगोदरच फुल्ल होऊन जात असल्याने प्रवाशांची मोठी अडचण होते. ही अडचण दूर करण्यासाठी पश्चिम विदर्भातील बडनेरा रेल्वे स्थानकावरून नाशिक रोड रेल्वे स्थानकासाठी अनारक्षित विशेष गाडी सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ही गाडी नियमितपणे सुरू आहे. या रेल्वे गाडीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभतो. या रेल्वे गाडीची मुदत येत्या ३० जून रोजी संपुष्टात येणार होती. त्यामुळे प्रवाशांची पुन्हा एकदा मोठी अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने बडनेरा – नाशिक रोड विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा – नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष, पूर्वी ३० जूनपर्यंत चालवण्याची सूचना होती. ती आता ०१ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या रेल्वे गाडीच्या ९२ सेवा होतील. ट्रेन क्रमांक ०१२१२ नाशिक रोड – बडनेरा जंक्शन अनारक्षित दैनिक विशेष गाडी आता ०१ जुलै ते ३० स्पटेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या गाडीच्या देखील ९२ सेवा होतील. या गाडीच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. या विशेष गाडीच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या विशेष रेल्वे गाडीमुळे पश्चिम विदर्भातून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा झाली आहे.