Revenue Minister / Chandrashekhar Bawankule नागपूर : शेतजमीनी आणि घरांच्या मोठ्या प्रमाणावर नोंदणी (रजिस्ट्री) दुय्यम निबंधक कार्यालयात केल्या जातात. या कार्यालयांमध्ये पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही असा अनुभव कायम सामान्य जनतेला येतो.

यावर महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट नागपूरच्य दुय्यम निबंधक कार्यालयात अचानक धाड टाकत झाडाझडती केली. यावेळी रजिस्ट्री नोंदणीमध्ये अनेक अनियमितता आढळली असून एका ड्रॉवरला कुलूप लावण्यात आले. हे ड्रावर उघडले असता त्यात पैशेही आढळून आले. थेट महसूल मंत्र्यांनीच निबंधक कार्यालयात धाड टाकल्याने संपूर्ण प्रशासनावर धाक निर्माण झाला आहे.

राज्यभरात महसूल विभागात शेतकरी आणि सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो अशी नेहमीच ओरड असते. अगदी ग्रामपंचायत, तलाठी ते तहसीलदार अशा अधिकाऱ्यांकडून असा त्रास दिला जातो.

शेतकरी आणि नागरिकांकडून कधी पैशांची मागणी केली जाते, तर कधी किरकोळ कामासाठीही अनेक हेलपाटे लावले जातात. त्यातच, खरेदी-विक्री कार्यालयातही नागरिकांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केल्या जात असल्याच्या अनेकदा तक्रारी येतात.

काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील दुय्यम निबंधकाच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी कार्यालयास अचानक भेट दिली आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. यापुढे तक्रारी आल्यास, काही गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला होता.

बावनकुळेंच्या अचानक भेटीमुळे सावनेर प्रशासनाची मात्र धावपळ झाल्याचे दिसून आले होते. नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात महसूलमंत्री बावनकुळे यांची अचानक भेट दिली. बावनकुळे यानी यावेळी लोकांच्या तक्रारींबाबत असलेल्या फाईल्सची तपासणी केली. महसूलमंत्री कार्यालयात अचानक पोहचल्याने प्रशासनात खळबळ उडाल्याचे दिसून आले. कामात गैरप्रकार आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिला. यापूर्वीही नागपुरातील दोन दुय्यम निबंधक कार्यालयात शेकडो कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते.

निबंधक कार्यालयात नेमके काय घडले?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, नागपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये विविध कामांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. पैसे घेतल्याशिवाय लोकांचे काम होत नाही. प्रत्येकाकडून पाच ते आठ हजार रुपये घेतले जातात.

अनेक एजेंट येथे काम करतात. त्यामुळे जनतेला न्याय देण्यासाठी आणि पारदर्शी कारभारासाठी नागपूरच्या निबंधक कार्यालयात धाड मारली. यावेळी झाडाझडती केली असता कामांमध्ये अनियमितता असल्याचे दिसून आले. एका ड्राव्हरमध्ये पैसेही आढळून आले. त्यमाुळे या प्रकरणात गंभीर कारवाई केली जाणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया केल्यानंतरही असे प्रकार घडत असल्यावर बावनकुळे यांनी चिंता व्यक्त केली.