नागपूर – संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा करा, दिव्यांगांना न्याय दया या प्रमुख मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या माजी मंत्री बच्चू कडू यांच्या महा एल्गार आंदोलनासाठी मोठ्या संख्येने आंदोलक सकाळपासूनच वर्धा मार्गावरील परसोडी शिवारात यायला सुरुवात झाली आहे.
आंदोलन लांबल्यास मुक्कामी राहण्याचा अनुषंगाने अनेक जण चटणी भाकर, चिवड्याची शिदोरी घेऊन आला आहे. आंदोलनावर पावसाचे सावट असले तरी शेतकरी संपूर्ण तयारीसह मैदानात उतरले आहेत. बच्चू कडू यांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनाची पद्धत पाहता, पोलिसांनी देखील मोठा फौजफाटा तैनात केला आहे. संपूर्ण वर्धा मार्गांवर आंदोलनस्थळ परसोडी पासून ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरीपर्यंत चौका चौकात पोलीस आणि मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत.
सरकारला सायंकाळी चार पर्यंत अल्टिमेटम
या घडामोडीत आंदोलकांनी कालच सरकारला सायंकाळी चार वाजेपर्यंत अल्टिमेटम देऊन झाला आहे. सरकारच्या वतीने मुख्यमंत्री आंदोलन स्थळी पोचले नाहीत, तर आंदोलक स्वतः मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान धडकतील अशी भूमिका आंदोलनाचे प्रणेते बच्चू कडू यांनी कालच जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रामगिरीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
वाहतूक मार्गात बदल
महा एल्गार मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहनांची संभाव्य कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने सोमवारी रात्रीच वाहतूक वळवण्यात येणार असल्याची अधिसूचना जारी केली आहे. वर्धेकडून नागपूरकडे येणारी वाहतूक जामठा चौकापासून डावे वळन घेऊन एनसीआयकडे जातील. तेथून यू टर्न घेऊन मेट्रो रेल्वे यार्ड सिमेंट फॅक्टरी, डीपीएस शाळा, मिहान डब्ल्यू इमारत मार्गे खापरी पोलिस चौकी या मार्गाने नागपूरकडे जातील.
दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा आंदोलनस्थळी सुरक्षेचा आढावा घेत बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांना सूचना केल्या.
