नागपूर : सामूहिक अत्याचार प्रकरणामुळे भंडारा पोलिसांचा कारभार राज्यभरात चर्चिला जातोय. त्यातच आता भंडारा पोलिसांचे संकेतस्थळही निष्क्रिय असल्याचे समोर आले आहे. भंडारा जिल्हा पोलिसांच्या संकेतस्थळावर  पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्याचे संपर्क क्रमांक नसल्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी सामान्य नागरिकांनी मदत मागायची कुठे, असा  प्रश्न निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी  ‘डोन्ट वरी’ समूहाचे वैभव बावणकर, संघर्ष अवसरे आणि योगेश बावणकर यांनी तत्कालीन भंडारा पोलीस अधीक्षक आणि पोलीस महासंचालकांना निवेदन देऊन संकेतस्थळ अद्ययावत करण्याची विनंती केली होती. मात्र, अद्याप संकेतस्थळावर कोणताही बदल करण्यात आला नाही.  डिजिटलच्या युगात भंडारा पोलिसांचे संकेतस्थळाकडे दुर्लक्ष करणे, हे अत्यंत बेजबाबदारपणाचे असल्याची टीका आता होत आहे. 

संकेतस्थळावर काय हवे?

पोलिसांच्या संकेतस्थळावर महिलांसाठी हेल्पलाईन, ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा स्त्रोत, सर्व पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांक, ठाणेदारांच्या नावासह त्यांचे संपर्क क्रमांक, गुन्हेगारांची माहिती, वाहतूक नियम व गुन्हे अहवाल याचे विवरण आणि माहिती हवी. परंतु, भंडारा जिल्हा पोलिसांच्या संकेतस्थळावर सर्वच पोलीस अधिकारी यांचे छायाचित्र व त्यांच्या नावाव्यतिरिक्त सामान्य जनतेला उपयोगी असणारी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

अधीक्षकांचे छायाचित्रही जुनेच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून अजूनही वसंत जाधव यांचेच छायाचित्र आहे. नवनियुक्त अधीक्षक लोहित मतानी यांना अद्याप भंडारा पोलिसांच्या संकेतस्थळावर स्थान मिळालेले नाही. वसंत जाधव यांची भंडारा जिल्ह्यातून बदली झाली झाले. त्यांच्या जागी  लोहित मतानी यांनी ५ ऑगस्टलाच पदभार स्वीकारला आहे. मात्र, भंडारा पोलिसांच्या संकेतस्थळावर अजूनही जुन्याच अधीक्षकांचे छायाचित्र आहे.