नागपूर: २०२४ मध्ये अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणामध्ये उप-वर्गीकरण करता येऊ शकते असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिला होता. न्यायमूर्ती गवई या घटनापीठात होते. यावेळी एससी, एसटी, आरक्षणामध्ये क्रिमी लेयरची तरतूद आणण्याची शिफारस घटनापीठाच्या चार न्यायमूर्तींनी केली होती. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई क्रिमी लेयरचं समर्थन करत म्हणाले होते, संविधानात मांडलेल्या समतेच्या तत्त्वाला प्रस्थापित करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं असू शकते. पण, इतर मागास वर्गाप्रमाणेच अनुसूचित जाती आणि जमातींसाठी देखील क्रिमी लेयर लागू करण्यासाठी सरकारने काही निकष ठरवायला हवे. ओबीसी आणि अनुसूचित जाती, जमातींचे निकष वेगवेगळे असू शकतात. यानंतर आता भूषण गवई सरन्यायाधीश झाले आहेत. आंबेडकरी समाजातील व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर गेल्यामुळे सर्वत्र अभिमान आणि आनंद व्यक्त केला जात असला तरी मात्र दुसऱ्या वर्गाकडून गवई यांच्यावर टीका होत आहे. नेमकं काय प्रकरण आहे पाहूया..
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी भूषण गवई यांच्यावर एका कार्यक्रमादरम्यान प्रचंड टीका केली आहे. काय म्हणाले सुजात, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आईने बाबासाहेबांमुळे आम्हाला हे दिवस पाहता आले हे जे विधान केलं ते केवळ भावनिक आहे.
न्यायमूर्ती गवई हे आजपर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवर कधीही चाललेले नाहीत, हे सत्य नाकारता येणार नाही. या राज्यातील आंबेडकरवादी चळवळ विकून खाण्याचे काम गवई यांच्या भावाने केले आहे. तर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जातीय वर्गीकरणाचा कायदा आणण्याचा निर्णय दिला आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणाला धक्का लावण्याचं काम या न्यायाधीशांनी केले. त्यामुळे माणूस बौद्ध असण्यापेक्षा विचारांनी आंबेडकरवादी असणे आवश्यक आहे, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले.
डॉ. राजेंद्र गवई यांनी काय प्रत्युत्तर दिले
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर टीका केल्यानंतर, त्यांच्या टीकेला भूषण गवई यांचे बंधू आणि रिपाई गवई गटाचे नेते डॉ.राजेंद्र गवई यांनी प्रत्युत्तर दिले.
प्रकाश आंबेडकर यांनी नेहमी रा.सू. गवई यांना विरोध केला. सुजात आंबेडकर हे अॅड. भूषण गवई यांना विरोध करत आहेत. जे लोक बौद्ध समाजाचा एक आमदार निवडून आणू शकले नाहीत, त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झाल्याचे वाईट तर वाटणारच ना… भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याचे सुजात आणि प्रकाश आंबेडकर या बापलेकाला दुःख झाल्याचे मला नवल वाटत नाही, असे डॉ. राजेंद्र गवई म्हणाले. २०१९ विधानसभा निवडणूक आणि २०२४ विधानसभा निवडणुकीत आपल्याला प्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता संपत चाललेली दिसेल. त्यामुळे आंबेडकर पिता पुत्राकडे दुर्लक्ष करा, असे प्रत्युत्तर राजेंद्र गवई यांनी आंबेडकर पिता पुत्राला दिले. मी एमबीबीएस आहे. त्यामुळे मला सायकॉलॉजी कळते. मला मानसशास्त्राचा चांगला अभ्यास आहे. माणूस हतबल असला की अशा गोष्टी बोलतो. त्यांच्यावर फार काही बोलून त्यांचे महत्त्व वाढवायला नको, असेही राजेंद्र गवई म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत कुणाला सोडलंय?
भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने देशात आनंद आहे. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे आदी नेत्यांचे फोन आले. त्यांचा सत्कार करायचा असल्याचे सांगितले. पण ते प्रोटोकॉलमध्ये बसते की नाही, ते माहिती नाही. परंतु गट तट विसरून सगळ्यांनी फोन केले. प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत कुणाला सोडलंय? यांनी आठवलेंना सोडलं नाही, यांनी सविता माईसाहेब आंबेडकरांना सोडलं नाही. त्यामुळे आंबेडकर पित्रा पुत्राकडे दुर्लक्ष करा, असे राजेंद्र गवई म्हणाले.