अकोला : माजी सैनिकांसह सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. शासकीय व खासगी क्षेत्रात शेकडो पदांवर भरती केली जाईल. दहावी ते पदवीधर उमेदवारांना शेकडो पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन प्राप्त होणार आहे.
अकोला जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात तीन नामांकित खासगी कंपन्यांमार्फत एकूण १०० रिक्त पदांची भरती केली जाईल. यामध्ये शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर उमेदवारांना संधी उपलब्ध आहेत.
या मेळाव्यासाठी ऑनलाईन अर्ज महास्वयम वेब पोर्टलच्या माध्यमातून करावा व मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्यास प्रत्यक्ष उपस्थित राहावे. जास्तीत जास्त नोकरी इच्छूक उमेदवारांनी आपले बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, तसेच पासपोर्ट साईज फोटो व इतर आवश्यक कागदपत्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.
माजी सैनिकांना शासकीय नोकरीची संधी
सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे व अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांमध्ये लिपिक टंकलेखक (गट-क) या एकूण ७२ पदांच्या भरतीसाठी केवळ माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांपैकी एक पद दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव असून, किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारांमधून गुणवत्ता आणि उपलब्धतेनुसार भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया टिसीएस-आयओएन यांच्या मार्फत पार पडणार असून, अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. कोणत्याही अन्य माध्यमातून आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज http://www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील Resources Tab → Recruitment Tab मध्ये जाऊन १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतापासून ते ५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जासाठीची लिंक बंद होईल. सर्व पात्र माजी सैनिक उमेदवारांनी या भरती संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.