नागपूर : छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे काही गाड्या रद्द तर काहींना वेळात बदल करण्यात आले आहे. ही दुर्घटना बिलासपूर–कटनी रेल्वे विभागातील लाल खदान परिसरात दुपारी साधारण चारच्या सुमारास घडली. कोरोबा पॅसेंजर (क्रमांक ६८७३३) आणि एका मालगाडीची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत पॅसेंजर गाडीचे काही डबे रुळांवरून घसरले. अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, दोन डझनहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ बिलासपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे.
धडकेनंतर रेल्वेच्या ओव्हरहेड वायर्स, सिग्नल प्रणाली आणि रुळांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही तासांसाठी पूर्णपणे ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या बचाव आणि दुरुस्ती पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन सेवा यंत्रणा बचावकार्यात गुंतली असून, रुळांवरून नुकसानग्रस्त डबे हटवण्याचे काम सुरू आहे.
प्राथमिक चौकशीत सिग्नल बिघाड किंवा मानवी चूक ही अपघाताची संभाव्य कारणे असल्याचे समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
बिलासपूर रेल्वे स्थानक आणि गेवरा दरम्यान आज झालेल्या मेमू स्थानिक गाडीच्या रुळांवरून घसरण्याच्या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नसली तरी अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खालील गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत –
६८७३२ बिलासपूर – कोरबा मेमू स्थानिक
६८७३१ कोरबा – बिलासपूर मेमू स्थानिक
६८७१९ बिलासपूर – रायपूर मेमू स्थानिक
दरम्यान, काही दीर्घ पल्ल्याच्या गाड्या उशिराने सुटणार आहेत. १८५१७ कोरबा – विशाखापट्टणम एक्सप्रेस ही गाडी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १६.१० वाजता सुटण्याचे नियोजित होते, परंतु ती आता रात्री २१.३० वाजता म्हणजेच ५ तास उशिराने सुटेल.
१८२३९ गेवरा रोड – नेताजी सुभाषचंद्र बोस एक्सप्रेस ही गाडी १८.१३ वाजता सुटणार होती, परंतु ती ३ तास ३० मिनिटे उशिराने, म्हणजे रात्री २१.४३ वाजता सुटेल.
१८११४ बिलासपूर – टाटानगर एक्सप्रेस ही गाडी देखील १८.५० वाजता सुटण्याचे नियोजित होते, परंतु ती आता ३ तास उशिराने, रात्री २१.५० वाजता सुटेल.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातग्रस्त रुळांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवाशांना पर्यायी व्यवस्था आणि आवश्यक ती माहिती देण्यात येत आहे. परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी काही तास लागू शकतात.
