नागपूर : केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर देशात इतर ठिकाणीही मान्सूनच्या हालचालींना वेग आला आहे. तर त्याचवेळी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका देशाच्या किनारपट्टीवर येऊन ठेपला आहे. येत्या ४८ तासात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

या तीन दिवसांत ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ तीव्र होणार असून त्याचा परिणाम देशातल्या अनेक भागांत पाहायला मिळणार आहे. प्रामुख्याने भारताच्या किनारपट्टीवार याचा मोठा परिणाम दिसून येईल. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रालादेखील इशारा दिला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन पथके त्यादृष्टीने सतर्क झाली आहेत.

हेही वाचा – “मिशन-४५” ने वाढविली डोकेदुखी! बुलढाणा लोकसभेची जबाबदारी कट्टर विरोधकाकडे; भाजपाच्या डावपेचांनी शिंदे गट अस्वस्थ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टीसह गुजरातलादेखील या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे राज्याच्या किनारपट्टी भागात तसेच महाराष्ट्रातील मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान १२ जूनपर्यंत मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये अशाही सूचना खात्याने दिल्या आहेत. किनारपट्टी भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दहा ते बारा जूनदरम्यान ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.