विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची माघार
विधान परिषदेच्या नागपूरच्या जागेबाबत सुरुवातीपासूनच उमेदवारासाठी शोधाशोध करणाऱ्या काँग्रेसने शनिवारी निवडणुकीच्या रिंगणातून उमेदवारच मागे घेऊन ही जागा भाजपला आंदण दिली. काँग्रेसच्या दोन उमेदवारांसह रिंगणातील इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपचे गिरीश व्यास बिनविरोध निवडून आल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज घोषित केले. ही जागा यापूर्वी काँग्रेसकडे होती.
विधान परिषदेच्या मुंबईतील एका जागेसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात झालेल्या तडजोडीनंतर काँग्रेसने नागपूरमधून, तर भाजपने मुंबईतील एका जागेवरून माघार घेतल्याची माहिती आहे. नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेची निवडणूक प्रथमच बिनविरोध झाली आहे.
विधान परिषदेच्या एका जागेसाठी पाच उमेदवारांचे अर्ज होते. यात काँग्रेसकडून अशोकसिंह चौव्हान (अधिकृत) व संजय महाकाळकर (डमी), तर भाजपकडून गिरीश व्यास (अधिकृत) व महापौर प्रवीण दटके (डमी) व एक अपक्ष उमेदवार सुनील पवनीकर आदींचा समावेश होता. शनिवारी व्यास वगळता सर्व उमेदवारांनी माघार घेतली. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे संकेत शुक्रवारी सायंकाळी मिळाले होते. यासंदर्भात भाजप नेते नितीन गडकरी यांची काँग्रेसच्या काही नेत्यांशी चर्चाही झाली होती.
दरम्यान, गिरीश व्यास यांनी शनिवारी सायंकाळी नितीन गडकरी यांची वाडय़ावर व त्यानंतर संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली.