नागपूर: शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये शनिवारी विठ्ठल-रुख्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप धोटे यांना अटक करण्यात आली आहे. ते भाजपचे नेते असून पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत. याशिवाय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन दिवसांपूर्वी काटोल तालुक्यातील भाजपच्या दोन नेत्यांच्या पत्नी शिक्षिक म्हणून कधीही शाळेत न जाता वेतन उचलत असल्याची तक्रार केली होती. यासंदर्भातही चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात भाजप नेत्यांचा सहभाग असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
रविवारी विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेचे संस्थाचालक दिलीप धोटे यांना विशेष तपास पथकाने अटक केली. धोटे यांनी १५ शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून त्यांना नोकरी दिल्याचा आरोप आहे. तसेच प्रत्येकाकडून त्यांनी १५ लाख रुपये घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये बनावट दस्तऐवजांच्या आधारे मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी चरण नारायण चेटुले (६३, भंडारा) यांना अटक केली होती. त्यानंतर आता दिलीप धोटे यांची यांना अटक करण्यात आली आहे. दिलीप धोटे हे कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथील भाजप नेते आहेत. त्यांच्या संस्थेच्या कळमेश्वर तालुक्यात प्रतिभा उच्च प्राथमिक शाळा आणि धापेवाडा पब्लिक स्कूल अशा दोन शाळा आहेत. ते भाजपचे नेते असून यापूर्वी पंचायत समितीचे सदस्यही राहिले आहेत.
धोटे यांनी १५ शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोप आहे. त्यांच्याकडून त्यांनी प्रत्येकी १५ लाख रुपये घेतले आहेत. यासोबतच त्यांनी राजाबक्षा येथील नवयुवक प्राथमिक शाळेत या शिक्षकांना नियुक्ती दाखवल्याचा आरोप आहे. एसआयटी प्रमुख सुनीता मेश्राम यांनी सर्व शिक्षकांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवला आहे. यात शिक्षकांनी कबुली दिली की त्यांनी १५ लाख रुपये दिलीप धोटे यांना दिले. सोबतच त्यांना मिळत असलेल्या वेतनातून काही पैसेही धोटे ठेवत असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. या अटकेमुळे शिक्षण क्षेत्रात नवीन खळबळ उडाली आहे.
काटोल तालुक्यातही भाजप नेत्यावर आरोप
नागपूरच्या गायत्री प्राथमिक शाळेत काटोल तालुक्यातील दोन शिक्षिकांची नियुक्ती असताना त्या कधीही शाळेत गेल्या नाही. पण, अनेक वर्षांपासून वेतन उचलत होत्या. यातील एका महिलेने निवडणूकही लढवली, असे सांगून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. काटोल तालुक्यातील दोन भाजप पदाधिकाऱ्यांच्या या पत्नी असल्याचा आरोप आहे. या दोन्ही शिक्षिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सहायक शिक्षक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे या दोघांच्या नियुक्तीबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.
