यवतमाळ : पुसद शहरात बांगलादेशी नागरिक अवैधपणे राहत असून अशा नागरिकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा  या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात  ठाण मांडले. सोमय्या यांनी पुसधमध्ये येताना काही पुरावे  सोबत आणले. पुसद शहरातील बांगलादेशी नागरिकांना बोगस जन्म दाखले देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह दोषी नागरिकांच्या विरूध्द  गुन्हे दाखल करण्याचा अर्ज त्यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात दिला . पुसद शहरात ५० बोगस बांगलादेशी असून त्यांच्याकडे बोगस बांगलादेशचे जन्म प्रमाणपत्र असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. 

पुसदमध्ये बांगलादेशी असल्याचा  आरोप  सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.  आज पुसद पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक उमेश बेसकर यांच्याशी चर्चा केली. बेसकर यांनी सोमय्या यांची बाजू ऐकून घेतली. यावेळी  मुख्याधिकारी अरुण वायकोस तसेच तहसीलदार महादेव जोरवर उपस्थित होते.

सोमय्या पुसद शहरात दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने शहर पोलीस स्टेशनला उपस्थित होते. यावेळी भाजप पुसद तालुकाध्यक्ष पंजाब भोयर यांनी भला मोठा प्रतिकात्मक हातोडा देऊन सोमय्या यांचे स्वागत केले. हा हातोडा स्वीकारून व वर उंचावून सोमय्या यांनी कार्यकर्त्यांंचा उत्साह वाढवला. सोमय्या हे ५० जन्म प्रमाणपत्र घेऊन  पुसद शहरात दाखल झाल्याने, शहरात अवैधपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.  किरीट सोमय्या परळी, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील दौरा करून आज विदर्भात दाखल झाले.