वर्धा : रोखठोक भूमिका घेवून भाजपामध्ये खळबळ उडवून देणारे आर्वीचे आमदार दादाराव केचे आता आरपारच्या लढाईत उतरले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहून माझ्या पत्राशिवाय माझ्या मतदारसंघात निधी देताच कसा, असा सवाल त्यांनी पत्रातून उपस्थित केल्याने ज्येष्ठ नेतेही थक्क झाले.

फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांनी विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आर्वीसाठी आणला. हे कोण निधी वाटप करणारे, असे केचे विचारतात. वानखेडे हे भाजपाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आल्याने केचे अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. याच संबंधाने काही नेत्यांनी जुना संदर्भ दिला.

हेही वाचा – नागपूर : काही वादग्रस्त वाहतूक पोलिसांच्या बदल्या

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू सुधीर दिवे यांना केचे ऐवजी तिकीट मिळणार, असे निश्चित झाले होते. एकवीस सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाली त्याच दिवशी दिवे समर्थकांचा मोठा मेळावा झाला होता. ते पाहून तिकीट जाहीर झाले नसतानाही केचे यांनी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले होते. म्हणजेच प्रसंगी अपक्ष उभे राहण्याची केचे यांची तयारी पाहून शेवटी दिवे यांना काही आश्वासन देवून शांत करण्यात आले. परत केचेंनाच संधी दिली. त्यावेळी ही तुमची शेवटची संधी, असे केचेंना स्पष्ट करण्यात आल्याचे त्या घडामोडींशी संबंधित काही नेते आता नाव न टाकण्याच्या अटीवर सांगतात.

हेही वाचा – नागपूर : पेट्रोल पंपचालकाचा भर दुपारी खून, दीड लाखांची लुटमार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केचेंना ही शेवटची संधी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ते मान्य केल्यानेच त्यावेळी त्यांना संधी मिळाली, असे निदर्शनास आणून दिल्या जाते. मात्र, केचे ही बाब सपशेल फेटाळून लावतात. ते म्हणाले, की हा आता चुकीचा प्रचार केल्या जात आहे. त्यापूर्वीची विधानसभा निवडणूक मी हरलो होतो. म्हणून ही आता मिळालेली संधी दवडू नका, विजयी व्हाच, असे नेत्यांनी म्हटले होते. आता नाहक चुकीचं सांगितल्या जात आहे, असे केचे यांनी सांगितले. आता पुढे काय, असा प्रश्न भाजपा वर्तुळात चर्चेला आहे.