नागपूर : शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी मंगळवारी संध्याकाळ पासून नागपूर हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांसह ठिय्या मांडला आहे. त्यामुळे यवतमाळ नागपूर, चंद्रपूर -नागपूर हे सर्व महामार्ग बंद पडले आहे. लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. या चक्का जाम आंदोलनात भाजपचे आमदार अडकले. सुरक्षा रक्षकाच्या घेऱ्यात तोड लपवून त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण प्रहारच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडले व थेट बच्चू कडू यांच्यापुढे नेऊन बसवले.चार तास त्यांना बसवून ठेवले.

वर्धा जिल्ह्यातील देवळीचे भाजप आमदार राजू बकाने यांच्यावर हा बाका प्रसंग ओढावला. काल ते देवळीहून नागपूरला येत असताना चक्का जाम आंदोलनात त्यांना बुटीबोरीजवळ जक्काजाम आंदोलनाचा फटका बसला. त्यांचे वाहन तेथे अ डकले. ते वाहन सोडून सुरक्षा रक्षकाच्या मदतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले. दरम्यान आंदोलनात वर्धा जिल्ह्यातील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

त्यांनी आमदार बकाने यांना ओळखले व त्यांना अडवून बच्चू कडूंजवळ नेऊन बसवले. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या व यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार बकाने यांच्याकडून घेतले, सभागृहात हा मुद्दा आपण मांडू असे आश्वासन यावेळी बकाने यांनी दिले.

दरम्यान आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळपासूनच महामार्गारील वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा फटका या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना बसला आहे. नागपूरमधून बुटीबोरी एमआयडीसीत काम करणारे हजारो कर्मचारी आहे. ते काल अडकून पडले होते. आज त्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.