चंद्रपूर: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे तिकीट आमदार किशोर जोरगेवार, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर तसेच मी स्वतःही कुणाला देऊ शकत नाही. “नेत्यांच्या मागे लागणाऱ्यांना आणि मागे फिरणाऱ्या तर तिकीट मिळणारच नाही.” भाजप लवकरच एक सर्वेक्षण करणार आहे आणि सर्वेक्षणात जनतेच्या मनात आघाडी घेणाऱ्याच उमेदवारी दिली जाईल असे स्पष्ट वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याने नेत्यांच्या मागे फिरत उमेदवारीची अपेक्षा ठेवून असलेल्या अनेकांचे चेहऱ्यावरील रंग उडाला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मोठे विधान केले. यावेळी मंचावर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छबू वैरागडे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. येत्या काही दिवसांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात एक महत्त्वाचे विधान केले.
बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “नेत्यांच्या मागे लागणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता तिकीट मिळण्याची अपेक्षा करू नये.” त्यांनी स्पष्ट केले की जनताच आता तिकिटांचा निर्णय घेईल. विभागीय पातळीवर पक्षाच्या सर्वेक्षणांवर आणि कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष पाठिंब्यावर आधारित तिकिटांचे वाटप केले जाईल. यावेळी बावनकुळे म्हणाले, “नेत्यांच्या मागे लागणाऱ्यांना किंवा मागे फिरणाऱ्या तिकीट मिळणार नाही हे आताच लक्षात घावे. आणि त्यानुसार काम करावे”. माझ्या गाडीत कुणी फिरत आहे, प्रवास करीत आहे म्हणून त्याला तिकीट दिले जाईल या भ्रमात कुणी राहू नये असेही ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, भाजपचे उद्दिष्ट केवळ निवडणुका जिंकणे नाही तर जनतेचा विश्वास जिंकणे आणि पारदर्शक व्यवस्था स्थापित करणे आहे. त्यामुळे, केवळ “वरिष्ठ नेत्याशी जवळीक” किंवा “नेत्याच्या मागे लागणाऱ्या” आधारावर कोणालाही तिकीट मिळणार हे नाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवून काम करावे.
विशेष म्हणजे चंद्रपूरमध्ये गेल्या काही काळापासून माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार या भाजपच्या दोन प्रमुख गटांच्या समर्थकांमध्ये तीव्र गटबाजी सुरू आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. या पार्श्वभूमीवर, बावनकुळे यांच्या विधानाला विशेष महत्त्व आहे. राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की त्यांचा स्पष्ट संदेश भाजपच्या अंतर्गत कार्यप्रणालीवर परिणाम करेल आणि कदाचित अधिक पारदर्शक तिकीट वाटप प्रक्रियेला चालना देईल. बावनकुळे यांच्या विधानामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अनेक कार्यकर्ते आता संघटना आणि पाठिंबा मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. गटबाजीच्या या वातावरणात, हे विधान आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचे संकेत देते. तसेच मागील काही दिवसांपासून केवळ तिकीट मिळणार या आशेवर अनेक आजी माजी नगरसेवक, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या गटातून त्या गटात त्या गटातून या गटात अशा अक्षरशः उड्या मारल्या आहेत. अशा वेळोवेळी नेते बदलणाऱ्या दलबदलू नेत्यांच्या चेहऱ्यावरील रंग बावनकुळे यांच्या वक्तव्याने उडाला आहे.