नागपूर : महायुतीतील घटक पक्षासाठी जागा सोडण्याच्या सूत्रामुळे भाजपला पक्षाच्या बालेकिल्ल्यात म्हणजे विदर्भात २०१९ च्या तुलनेत ९ हून अधिक जागावर कमी लढवाव्या लागणार आहे. २०१९ मध्ये भाजपने ५० जागी उमेदवार उभे केले होते. ही संख्या आता कमी होण्याची शक्यता आहे.

विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती होती. भाजपने ५० तर शिवसेनेने १२ जागी उमेदवार उभे केले होते. भाजपने ५० पैकी २९ तर शिवसेनेने १२ पैकी चार जागी विजय मिळवला होता. एकसंघ राष्ट्रवादीने सहा जागा जिंकल्या होत्या. २०२४ मध्ये राजकीय चित्र बदलले. भाजप शिवसेना युती तुटली.

हेही वाचा >>> पुण्यात शिंदे गटाच्या वाट्याला केवळ एकच जागा ?

शिंदेगट सोबत आला व त्यांच्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा महायुतीत समावेश झाला. विद्यमान आमदारांसाठी जागा सोडण्याचे महायुतीचे जागा वाटपाचे सूत्र आहे. शिंदे गटाला सोडाव्या लागणाऱ्या चार जागा एकसंघ शिवसेनेच्याच वाट्याच्या होत्या. त्यामुळे तेथे भाजपला अडचण जाणार नाही, पण राष्ट्रवादीने जिंकलेल्या सहापैकी पाच जागा २०१९ मध्ये भाजपने लढवलेल्या होत्या. त्या जागा भाजपला सोडाव्या लागणार आहे. अजित पवार गटला विरोध होण्यामागे हे सुद्धा एक प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय मागील निवडणुकीत भाजप उमेदवारांना पराभूत करून विजयी झालेल्या दोन अपक्षांचा महायुतीला पाठिंबा आहे. त्यांच्यासाठी दोन जागा सोडाव्या लागणार आहे.

हेही वाचा >>> पैठणमध्ये भूमरे यांच्या वर्चस्वाला शह देण्याची ठाकरे गटाची खेळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीच्या जागा

विदर्भात २०१९ मध्ये राष्ट्रवादीने पुसद (जि. यवतमाळ), काटोल (जि. नागपूर), तुमसर (जि. भंडारा), अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया), अहेरी (जि. गडचिरोली) आणि सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) अशा एकूण सहा जागा जिकंल्या होत्या. यापैकी सिंदखेड राजाची जागा सोडली तर पाच ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवार हा भाजपचा होता. २०२४ मध्ये या जागा भाजपला लढवता येणार नाहीत. पुसदमध्ये राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईक यांनी भाजपच्या नीलय नाईक यांचा, काटोलमध्ये अनिल देशमुख यांनी भाजपच्या चरण ठाकूर यांचा, तुमसरमध्ये राजू कारेमोरे यांनी भाजपच्या पडोळे यांचा, अर्जुनी मोरगावमध्ये मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा तर अहेरीत धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपचे माजी मंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा पराभव केला होता. त्याचप्रमाणे रामटेक (जि. नागपूर)मध्ये विद्यमान अपक्ष आमदार आशीष जयस्वाल यांनी भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी यांचा तर भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विरोधातही भाजप उमेदवार रिंगणात होता. या भाजपच्या कोट्यातील जागा आता त्यांना सोडाव्या लागणार आहेत.