सीबीएसईचे परिपत्रक धाब्यावर

महाराष्ट्र शासनाचा २००४ चा शासन निर्णय आणि सीबीएसईच्या परिपत्रकाला वाटाण्याच्या अक्षता लावून नागपुरातील सीबीएसईच्या ९९ टक्के शाळांमध्ये याही शैक्षणिक सत्रात एनसीईआरटीची पुस्तके अभ्यासक्रमात नाहीत. काही शाळांनी मोजक्या इयत्तांना ती लागू केली असून बाकी खासगी प्रकाशकांचीच पुस्तके कायम ठेवली आहेत.

शाळा व्यवस्थापनाकडून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची (एनसीईआरटी) पुस्तके न घेण्याचे अनेक बहाणे सांगितले जात आहेत. विशेष म्हणजे, एनसीईआरटीची पुस्तके स्वस्त आणि तज्ज्ञांकडून तयार केलेली असतानाही खासगी प्रकाशकांपेक्षा ती कशी दुय्यम आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न प्राचार्याकडून होताना दिसतो.

शाळेत कुठल्याही प्रकारे वस्तूंची विक्री करू नये, यासंदर्भात सीबीएसईने १९ एप्रिल २०१७ला एक परिपत्रक काढले आहे. त्याही पूर्वी महाराष्ट्र शासनाने ११ जून २००४ शासन निर्णय जारी करून शाळांमधील शैक्षणिक साहित्य विक्रीवर बंदी आणत एनसीईआरटीची पुस्तके वापरण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या परिपत्रकानंतरही आजही ९९ टक्के शाळांमध्ये एनसीईआरटीची नव्हे तर खासगी प्रकाशकांची पुस्तकेच घेण्यास भाग पाडले जात आहे. एकीकडे एनसीईआरटीची पुस्तके मिळत नसल्याची ओरडही सुरू आहे. या पुस्तकांची सक्ती करून एका उद्योजकाला सर्व व्यवसाय देऊन इतर खासगी प्रकाशकांना देशोधडीला लावले जात असल्याचाही सूरही काही प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांकडून आळवला जात आहे. मात्र, शाळा, प्रकाशक आणि दुकानदारांच्या अभद्र युतीमुळे पालक नागवला जात आहे. पालकांच्या मते जी पुस्तके १०० रुपयांच्या आत मिळतात तीच खासगी प्रकाशकांकडून २५० ते ३०० रुपयाला विकली जातात.

शाळांद्वारे एनसीईआरटीच्या बाबतीत मुद्दामहून गैरसमज पसरवले जात असून पालकांच्या मनातही तशीच भीती निर्माण केली जात आहे. खासगी प्रकाशकांकडून ज्याप्रमाणे डिसेंबर जानेवारीमध्येच बोलणी करून पुस्तके मागवली जातात. तशीच बोलणी एनसीईआरटीची पुस्तके विकणाऱ्या दुकानदारांकडून का बरे केली गेली नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. नवोदय विद्यालयातून उत्तीर्ण होऊन यूपीएससी किंवा इतर अनेक क्षेत्रात यश मिळविणारे विद्यार्थी एनसीईआरटीच्याच पुस्तकातून शिकतात हे येथे उल्लेखनीय.

एनसीईआरटीईची पुस्तके पुढच्या वर्षी

यावर्षी खासगी प्रकाशकांसोबत डिसेंबरमध्येच बोलणी झाल्याने आम्हाला यंदा तीच पुस्तके वापरावी लागतील. मात्र, पुढील वर्षीपासून आम्ही एनसीईआरटीचीच पुस्तके उपयोगात आणू. आताच्या घडीला काही इयत्तांना एनसीईआरटीची पुस्तके आहेत तर काही इयत्तांसाठी खासगी प्रकाशकांच्या पुस्तकातूनच शिकवले जाणार आहे. एनसीईआरटीची पुस्तके मिळतही नाहीत. शिवाय त्यात केवळ भाषेवर भर असतो.

– आशा कामत, प्राचार्य, संस्कार विद्यासागर