बुलढाणा : राज्यासह जिल्ह्यातही विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. इतर जिल्ह्यात युतीच्या उमेदवारीसाठी चढाओढ दिसत असताना बुलढाणा जिल्ह्यात मात्र सारेकाही आलबेल असल्याचे चित्र आहे. सात मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारीसाठी चुरस नसून, आघाडीमध्ये मात्र काट्याची चुरस दिसून येत आहे. दुसरीकडे, युतीतील जागावाटप ठरल्यागत असताना आघाडीत जागावाटपाचा संभ्रम कायमच आहे.

जिल्ह्यात बुलढाणा, चिखली, मेहकर (अनुसूचित जाती राखीव), सिंदखेडराजा, खामगाव, मलकापूर आणि जळगाव जामोद या मतदारसंघांचा समावेश आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीमुळे चार प्रमुख पक्षांऐवजी आता सहा राजकीय पक्ष आहेत. राष्ट्रवादीमधील दोनही गट मर्यादित असले तरी दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि भाजप जिल्हाव्यापी आहेत. लोकसभेप्रमाणेच युती विरुद्ध आघाडी, अशा लढती सातही ठिकाणी रंगणार स्पष्टच आहे. या लढतीचा तिसरा कोन वंचित आघाडी (हा घटक) ठरू शकतो, असा सध्याचा रागरंग आहे.

हेही वाचा >>>सोन्याच्या दरात घसरण…लाडकी बहीणींचा आनंद द्विगुनीत…

शिवसेना शिंदे गटाला बुलढाणा मतदारसंघाची जागा सुटणार आणि उमेदवार संजय गायकवाड, तर मेहकरमध्ये आमदार संजय रायमूलकर उमेदवार, हे उघड रहस्य आहे. सिंदखेडराजा राष्ट्रवादी अजितदादा गटाला आणि उमेदवार राजेंद्र शिंगणे, हे जवळपास निश्चितच आहे. चिखली भाजपला आणि उमेदवार आमदार श्वेता महाले, खामगाव भाजप आणि उमेदवार आकाश फुंडकर, जळगाव भाजप आणि उमेदवार संजय कुटे, हे ‘फायनल’ आहे. याला किंचित अपवाद मलकापूरचा आहे. मलकापूर भाजपला सुटणे अटळ असले तरी नेहमीप्रमाणे उमेदवार माजी आमदार चैनसुख संचेती हेच राहतील, असे नाही. संचेती यांना बदलायचे असे ठरले तर त्यांचे चिरंजीव राहुल संचेती, बलदेव चोपडे, शिवचंद्र तायडे, पराग सराफ हे पर्याय आहेत. यामुळे युतीपुरता तरी केवळ मलकापूरमध्येच उमेदवारीचा तिढा आहे. या स्थितीत सहा मतदारसंघांतून युतीचे विद्यमान आमदारच उमेदवार राहणार, हे निश्चित आहे.

दुसरीकडे, आघाडीत मात्र जागावाटपावरून संभ्रम वा अनिश्चितता कायम आहे. मलकापूर, चिखली, खामगाव हे मतदारसंघ काँग्रेसला, सिंदखेडराजा व जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, बुलढाणा आणि मेहकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटण्याची जास्त शक्यता आहे. बुलढाण्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत हे मुख्य दावेदार असून त्यांनी प्रचारदेखील सुरू केला आहे. त्यांच्याशिवाय डॉ. मधुसूदन सावळे, संजय हाडे, सदानंद माळी, हे इच्छुक आहेत. उच्चशिक्षित आणि बहुजन समाजाचे डॉ. सावळे हेही कामाला लागले आहेत. काँग्रेसतर्फे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश सचिव जयश्री शेळके, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड या तिघांत चुरस आहे. मीनल आंबेकर यांनीही जिल्हा समितीकडे अर्ज केला आहे. सिंदखेडराजामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे माजी आमदार रेखा खेडेकर स्वेच्छानिवृत्त उप जिल्हाधिकारी दिनेश गीते आणि गौरी गणेश शिंगणे हे इच्छुक आहेत. मात्र, काँग्रेसदेखील या जागेवर दावा करीत आहेत. आमदार शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) गेल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी जिल्हा समितीकडे केली आहे.

हेही वाचा >>>मतांसाठी लाडक्या बहिणीला १५०० रुपये आणि लाडक्या मंत्र्याला ५०० कोटींचा भूखंड; संजय राठोड भूखंड प्रकरण

जळगाववर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दावा केला असून पवारांच्या ‘हिरव्या झेंडी’मुळे सहकार नेते प्रसेनजीत पाटील कामाला लागले आहेत. मात्र तिथे काँग्रेसचाही दावा कायम असून किमान दहा जण लढण्यासाठी तयार आहेत. मेहकर मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस दावा करीत आहे. काँग्रेसतर्फे लक्ष्मण घुमरे, चित्रांगण खंडारे, साहेबराव पाटोळे, विजय अंभोरे यांच्यात चुरस आहे. शिवसेना उबाठातर्फे सिद्धार्थ खरात, गोपाळ बशिरे हे प्रयत्नशील आहेत. तेथील शिवसैनिकांनी उमेदवारी स्थानिक नेत्याला देण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसतर्फे चिखलीमधून माजी आमदार राहुल बोन्द्रे, मलकापूरमधून आमदार राजेश एकडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, हरीश रावळ, अरविंद कोलते हे देखील इच्छुक आहेत. खामगावमधून ज्ञानेश्वर पाटील, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, माजी आमदार दिलीप सानंदा यांच्यात चुरस आहे. जागावाटपाचा हा तिढा आणि उमेदवारीसाठीची पक्षांतर्गत आणि मित्र पक्षांतील चुरस महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.