लोकसत्ता टीम
नागपूर: स्वत:च्या सुटकेसाठी इंग्रजांकडे माफीनामा मागणाऱ्या आणि तुरुंगातील सुटकेनंतर स्वातंत्रलढ्याला विरोध करणाऱ्या सावरकारांचा विद्यापीठाकडून उदोउदो केला जात असल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मुख्यद्वारासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याने दहन करण्यात आले.
नागपूर विद्यापीठामध्ये शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मात्र, या कार्यक्रमांमध्ये भारतीय स्वातंत्रलढ्यात भाग घेणाऱ्या महापुरुषांना डावलून माफीनामा मागणाऱ्यांचा कार्यक्रम केला जातो असा आरोप कुणाल राऊत यांनी केला. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव आहे. मात्र, कृती तशी नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या धोरणावर अनेकांचा विरोध आहे. सावरकारांचे भारताच्या स्वातंत्रलढ्यात कुठलेही योजदान नाही. उलट त्यांनी माफी मागून स्वातंत्रलढ्याला विरोध केला. त्यामुळे त्यांच्या कार्याचा उदोउदो करणे चुकीचे असल्याचा आरोप राऊत यांनी केला. यावेळी एनएसयुआय आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची भेट घेत त्यांना सावरकरांचे कार्यक्रम का? असा सवाल केला. यावेळी कुलगुरूंना महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. यानंतर कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बाहेर सावरकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण केले.
आणखी वाचा-नागपूर : हत्ती चक्क १२ दिवसांच्या हक्काच्या वैद्यकीय सुट्टीवर!
आंदोलनामध्ये युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अजित सिंग, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पांडे, आशीष मंडपे, दयाशंकर शाहू, चेतन मेश्राम, रौनक नांदगावे आदी उपस्थित होते. नागपूर विद्यापीठामध्ये डिसेंबर महिन्यात सावरकरांवर नाटक सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी कल्याण मंडळाच्या संचालकांनी विशेष पत्र काढून सर्व महाविद्यालयांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. विद्यार्थी कल्यााण विभागाचे काम हे घरोघरी सावरकर पोहचवणे नसून विद्यार्थ्यांसाठी आवश्यक उपक्रम राबवणे आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या अशा धोरणांचा आम्ही निषेध करतो असे कुणाल राऊत म्हणाले.