अकोला : व्यसनाधीन पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या विवाहित महिलेची एका तरुणाची समाज माध्यमातून ओळख झाली. या ओळखीतूनच तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून कॅफेमध्ये महिलेचे सर्वस्व लुटले. वारंवार अत्याचार केल्यानंतर तरुणाने लग्नाला नकार देत धमकावले. या प्रकरणात नराधम आरोपी शुभम टाले याच्याविरुद्ध विविध कलमान्वये सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कॅफे की अनैतिक व्यवसायाचे केंद्र? असा प्रश्न निर्माण झाला असून कारवाईची मागणी केली जात आहे.

एका ३३ वर्षीय विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पती सतत दारू पिऊन मारहाण करीत असल्याने महिला वेगळी राहत होती. यावेळी शुभम टाले याच्यासोबत समाज माध्यमातून ओळख झाली. पुढे ओळख वाढून चांगली मैत्री झाली. आरोपीने विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून पतीपासून घटस्फोट घेण्यास सांगितले. काही दिवसांनंतर आरोपी विवाहित महिलेला घेऊन शहरातील जीएमडी मार्केट समोरील एका कॅफेत घेऊन गेला. त्या ठिकाणी महिलेवर अत्याचार केला. याच कॅफेमध्ये आरोपी तरुणाने विवाहित महिलेसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर घुमजाव करून विवाहित महिलेला लग्नासाठी स्पष्ट नकार दिला. विवाहित महिलेला शिवीगाळ करून तिला मारहाण देखील केली. त्यानंतर पीडित विवाहित महिलेने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपीविरूद्ध तक्रार दाखल केल्यावर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम गजानन टाले (वय २९ वर्ष, रा. सांगवी मोहाडी, जि. अकोला) याच्याविरुद्ध ६४, ६४ (२) (एम) बीएनएस या कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅफेमध्ये गैरकृत्य; प्रशासनाचे दुर्लक्ष

शहरातील विविध कॅफेवर अश्लील चाळे व गैरकृत्य केले जात असल्याचे प्रकार अनेक वेळा उघडकीस आले आहेत. कॅफेमध्ये तरुण-तरुणींना बसण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यासाठी अतिरिक्त शुल्क वसूल केले जाते. या प्रकरणाच्या तक्रारी झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शहरातील जवाहर नगर भागातील कॅफेंवर अचानक भेटी देऊन तपासणी केली होती. यावेळी अल्पवयीन मुलं-मुली अश्लील चाळे करीत असल्याचे आढळून आले होते. यासंदर्भात पोलीस अधीक्षक व महापालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्यानंतरही यावर आळा बसलेला नाही. आता पुन्हा एकदा विवाहित महिलेवर कॅफेमध्ये अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.