लोकसत्ता टीम

यवतमाळ : येथील लोहारा एमआयडीसी परिसरात असलेल्या मनोरमा दालमिलमध्ये डाळ साठवणुकीचा डोम कोसळून तीन कामगार ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले होते. मंगळवारी ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून अखेर दालमिल मालकासह व्यवस्थापक, कंत्राटदार यांच्याविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

राखी सुनिलकुमार गुगलीया (४५, प्रोप्रायटर, मनोरमा दाल मील), संजय पारसमल गुगलीया (५४, व्यवस्थापक) दोन्ही रा. वाघापपूर रोड, यवतमाळ, मुकुंद केशरी रा. जबलपूर (कंत्राटदार, ओम इंजिनीअरींग फर्म) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या अपघातात भावेश विजय कडवे, रा. वर्धा, सुरज सुंदरलाल काजले, मुकेश शंकरलाल काजले, रा. मध्यप्रदेश या तिघांचा जागीच मृत्यू झाला. दिलीप रामप्रसाद मावसकर, करण बाबुलाल धुर्वे हे दोन मजुर जखमी झाले होते. दालमिलमधील या घटनेनंतर लोहारा पोलिसांसह कामगार अधिकारी, औद्योगिक विभागाचे उपसंचालक यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली होती. त्या ठिकाणी काम करणाऱ्या अन्य कामगारांचे जबाब नोदविले होते. मनोरमा तूर दालमिलमध्ये डाळ कंटेनर मजुरांच्या अंगावर कोसळू हा अपघात झाला. यावेळी लोहारा पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता, १०० क्विंटल क्षमता असलेली लोखंडी साठवण टाकी खाली पडल्याचे निदर्शनास आले. यावेळी दालमिलचे संचालक संजय जैन हे तेथे हजर होते.

पोलिसांनी घटनेसंबंधाने विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की, १५ एप्रिल रोजी आठ ते नऊ मजूर व एक सुपरवायझर काम करीत होते. तूर साठवण हौदीखालीच पॅकिंगचे काम चालू होते. सदर ठिकाणी भावेश विजय कडवे (२३) रा. वर्धा, सुरज सुंदरलाल काजले (२०) रा. मध्यप्रदेश, मुकेश शंकरलाल काजले (३०) व रा.मध्यप्रदेश, दिलीप रामप्रसाद मावसकर (२७) रा. मध्यप्रदेश, करण बाबुलाल धुर्वे (२०) रा. मध्यप्रदेश हे लोखंडी हौदीच्या खाली तुरदाळीचे पोते शिलाई मशीनवर काम करत होते. दाल मीलचे समोरील शटरपासून १७ फुट अंतरावर एक लोखंडी हौदी ज्याची २०० क्विंटन क्षमता असलेली तुरदाळीची हौदी (टाकी) खाली जमिनीवर कोसळली. सदर हौदीच्या बाजुला चार लोखंडी पिलरला हौद जमीनीपासून १८ फुट अंतरावर वेल्डींगने जोडलेले असल्याचे समोर आले. हे वेल्डींग अर्ध्यातून तुटून हौद खाली पडले. त्याखाली पॅकिंगचे काम करणारे तीन जण ठार झाले. या अपघाताचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

व्यवस्थापनाने कामगारांचा बळी घेतल्याचा आरोप

मनोरमा दालमिलच्या प्रोप्रायटर राखी सुनिलकुमार गुगलीया, व्यवस्थापक संजय पारसमल गुगलीया कंत्राटदार मुकुंद केशरी यांच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे तीन कामगारांचा मृत्यू व दोन कामगार जखमी झाल्याचा आरोप आता कामगार करत आहेत. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अतुल चौहाण यांच्या तक्रारीवरुन लोहारा पोलिसांनी गुन्हा नोंद केला. त्यानंतर केलेल्या तपासात मालकासह व्यवस्थापक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाल्याने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.