अमरावती : इन्‍स्‍टाग्रामवर ओळख झालेल्‍या एका तरुणाला खासगी छायाचित्रे पाठवणे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणीला चांगलेच महाग पडले. मैत्रिणीची विवस्‍त्रावस्‍थेतील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्‍याची धमकी देऊन या तरुणाने पीडित विद्यार्थिनीचा छळ चालवला होता. त्‍याने तिच्‍याकडे शरीरसंबंधासाठी तगादा लावला होता. अखेर पीडितेने सायबर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपीच्‍या विरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे.

रोहन पाटील (रा. बल्‍लारशा, जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याचे ‘मिस्‍टर बेफिकिरा’ नावाचे इन्‍स्‍टाग्राम अकाऊंट आहे. पीडित तरुणी ही येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असून वसतिगृहात राहते. या तरुणीची काही महिन्‍यांपूर्वी आरोपीशी इन्‍स्‍टाग्राम मार्फत ओळख झाली. दोघांमध्‍ये संवाद वाढला आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. ती प्रेमात अडकल्‍याचे पाहून आरोपीने तरुणीला तिची विवस्‍त्र छायाचित्रे पाठविण्‍यास सांगितली. तिने आरोपीवर विश्‍वास ठेवून ती पाठवली देखील. पण, त्‍यानंतर लगेच काही दिवसांनी आरोपीने तरूणीला भेटण्‍याची गळ घातली. त्‍याने तिच्‍याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. तिने त्‍याला स्‍पष्‍टपणे नकार दिला.

हेही वाचा: निर्दयीपणाचा कळस! पायावर पाय ठेऊन बसल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाची बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

आरोपीने मात्र इन्‍स्‍टाग्रामवरील संवाद आणि खासगी छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्‍याची ,तिच्‍या नातेवाईकांना पाठविण्‍याची धमकी दिली. तिने आरोपीला समजावून सांगण्‍याचा प्रयत्‍न केला, पण त्‍याने तगादा सुरूच ठेवला. अखेर तरूणीने कुटुंबीयांना ही बाब सांगितली. त्‍यांनी तरुणीला धीर देत पोलीस तक्रार करण्‍यास सुचवले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल करण्‍यात आल्‍यानंतर पोलिसांनी आरोपीचे अकाऊंट ब्‍लॉक केले असून त्‍याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. सायबर पोलीस ठाण्‍याच्‍या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर आणि सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे यांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा: ताडोबातील ‘ती’ जखमी वाघीण आणि दोन बछडे सुरक्षित; रानडुकराची केली शिकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तंत्रज्ञानाने प्रगती केली आणि प्रत्येकाकडे मोबाईल, संगणक, टॅब आले. इंटरनेट या प्रणालीचा अविभाज्य अंग आहे. समाज माध्‍यमाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसारख्या माध्यमातून नवनवीन मित्र होतात. हाय हॅलो पासून चर्चा होत. यातून त्यांच्यात भावनिक नाते निर्माण होते. नेमक्‍या याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी गळ टाकून बसले आहेत. अशा गुन्हेगारांपासून सावध राहण्‍याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.