अमरावती : पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठांना लुबाडणारी कुख्यात इराणी टोळी अखेर गजाआड झाली आहे. मागील काही दिवसांपासून अमरावती ग्रामीण आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना, थांबवून स्वतःला पोलीस असल्याचे भासवून त्यांना लुबाडण्याच्या घटना वाढल्या होत्या. पुढे दरोडा किंवा खून झाल्याची खोटी बतावणी करून, सुरक्षिततेच्या नावाखाली मौल्यवान दागिने काढून पिशवीत किंवा खिशात ठेवण्यास सांगितले जात असे आणि याच वेळी हातचलाखीने दागिने लंपास केले जात होते.
तळेगाव, वरूड, मोर्शी, तिवसा, परतवाडा यांसारख्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असे गुन्हे घडले होते. ५ सप्टेंबर रोजी तळेगाव येथे अरुण गोरे (वय ६८, रा. यवतमाळ) त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून जात असताना, बुलेटवरील दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना थांबवले. पुढे खून झाल्याचे सांगून, सुरक्षिततेसाठी गळ्यातील सोन्याची पोत, गोफ, मंगळसूत्र आणि हातातील अंगठी असे एकूण ७४ ग्रॅमचे दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. याच वेळी हातचलाखीने दागिने घेऊन आरोपी पसार झाले. गोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी वरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारची घटना घडली.
स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि फिर्यादींनी दिलेल्या वर्णनावरून दोन्ही गुन्ह्यांमधील आरोपी आणि त्यांचे वाहन एकच असल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता, बीड जिल्ह्यातील परळी येथील सराईत गुन्हेगार इराणी जहीर अब्बास ऊर्फ मोटा हा त्याच्या साथीदारांसह असे गुन्हे करत असल्याची माहिती समोर आली.
१९ सप्टेंबरच्या रात्री आरोपी नागपूरहून परळीकडे जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे देवगाव चौकात नाकाबंदी करण्यात आली. पुलगावच्या दिशेने येणाऱ्या एका पांढऱ्या एसयूव्हीला थांबवून तपासणी केली असता, त्यात जहीर अब्बास ऊर्फ मोटा (४०, रा. परळी), लाला ऊर्फ गांधी समीर शेख (४८, रा. ठाणे), वसीम शब्बीर इराणी (२५, रा. बिदर) आणि नझीर हुसेन अजीज अली (५२, रा. बिदर) हे चार आरोपी सापडले. आरोपींकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान, त्यांनी अमरावती ग्रामीण हद्दीतील एकूण ९ गुन्ह्यांची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या पथकाने यशस्वी केली. यात उपनिरीक्षक सागर हटवार, मूलचंद भांबुरकर आणि इतर अंमलदारांचा समावेश होता.