अमरावती : मध्‍य रेल्‍वेच्‍या पाच विभागातील रेल्‍वे सुरक्षा दलाने रेल्‍वे पोलीस आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ अंतर्गत जानेवारी ते नोव्‍हेंबर या अकरा महिन्‍यांत १ हजार ९९ मुला-मुलींची सुटका केली आहे.आपल्या आई-वडिलांपासून ताटातूट झालेली, घरातून निघून गेलेली, हरवलेल्या अल्पवयीन मुला-मुलींना पुन्हा आपले आई-वडील, घर मिळावे यासाठी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या जवानांनी ७४० मुले आणि ३५९ मुलींची सुटका केली आहे.

त्‍यात मुंबई विभागातून ३७९, भुसावळ विभागातून २४७, पुणे विभागातून २४६, नागपूर विभागातून १६८ आणि सोलापूर विभागातून ५९ मुला-मुलींची सुटा करण्‍यात आली आहे. गेल्‍या वर्षी जानेवारी ते नोव्‍हेंबर या कालावधीत १ हजार ५३ मुला-मुलींना त्‍यांच्‍या घरी पोहचविण्‍यात रेल्‍वे सुरक्षा बलाच्‍या जवानांना यश मिळाले होते.भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर आदींच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित सुरक्षा रक्षक बलाच्या जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित कर्मचारी त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी सल्ला देतात.

हेही वाचा…पदावरील खाद्यापदार्थ विक्रेत्यांची अशीही चलाखी उघड; पोलीस, महापालिकेनेच दाखवली पळवाट?

ऑपरेशन अमानत

रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, ‘अमानत’ या मोहिमे अंतर्गत रेल्‍वे सुरक्षा दलाने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आणि त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने यासारख्या मौल्यवान वस्तू परत मिळवून दिल्या. चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत ५.२२ कोटी रुपये किमतीचे १४९१ प्रवाशांचे सामान परत मिळवले आहे. यापैकी ४३.७२ लाख रुपये किमतीचे सामान एकट्या नोव्हेंबर महिन्यात परत करण्यात आले. मुंबई विभागातून २.५५ कोटी रुपयांचे, भुसावळ विभागातून १.०७ कोटी नागपूर विभागातून ६७.८९ लाख, सोलापूर विभागातून ५१.८६ लाख तर पुणे विभागातून ३९.७३ लाख रुपयांचे सामान परत करण्‍यात आले.

हेही वाचा…अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे सुरक्षा दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वेच्या मालमत्तेवरील गुन्हे, हिंसाचार, रेल्‍वेच्या वाहतुकीत अडथळा इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचाही सामना करावा लागतो. रेल्वे सुरक्षा दलाच्या या जवानांनी समर्पण सतर्कतेने आणि धैर्याने आपली कर्तव्ये पार पाडली आहेत, अशी माहिती रेल्‍वेचे मुख्‍य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्‍वप्निल निला यांनी दिली आहे.