लोकसत्ता टीम
चंद्रपूर: भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष पदी राहुल पावडे तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी हरीश शर्मा यांची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.
या दोन्ही नियुक्त्यामध्ये वन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार गटाचे वर्चस्व आहे तर राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर गटाला पुन्हा एकदा डावलले आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद तथा महानगर पालिका व नगर पालिका निवडणूक बघता मागील काही दिवसांपासून भाजप महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना बदलणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. भाजपच्या प्रदेश निरीक्षक यांनी चंद्रपुरात तशी बैठक देखील घेतली होती. त्यानंतर मंगळवारी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानगर व ग्रामीण अध्यक्ष जाहीर केले.
यात महानगर अध्यक्ष पदी राहुल पावडे तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी हरीश शर्मा यांची नियुक्ती केली आहे. पावडे व शर्मा दोघेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप नेत्यांनी मुनगंटीवार गटाकडे जिल्हा भाजपची सर्व सूत्रे दिली आहे तर माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना डावलले आहे. महानगर अध्यक्ष पावडे यांनी महापालिकेत सलग चार वर्ष स्थायी समितीचे सभापती पदाची धुरा सांभाळली आहे.
आणखी वाचा- गडचिरोली: पुरातून चारचाकी काढण्याचा प्रयत्न अंगलट, दोन अभियांत्यासह तिघे थोडक्यात बचावले
त्यानंतर उपमहापौर देखील होते. महानगर कार्यकारिणीत देखील त्यांनी काम केले आहे. तर ग्रामीण अध्यक्ष शर्मा पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या बल्लारपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते. यापूर्वी शर्मा यांनी सलग चार वर्ष ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. आता त्यांची दुसऱ्यांदा या पदी नियुक्ती केली आहे. दरम्यान या नियुक्त्यानी अहिर गटाला धक्का बसला आहे.