चंद्रपूर :  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण शक्तिनिशी लढा, कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा असे आवाहन चंद्रपूरचे काँग्रेसचे निरीक्षक,  आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले.

हाँटेल सिद्धार्थ प्रिमीयर येथे चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा प्रभारी मुजीब पठाण, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार देवराव भांडेकर, महिला जिल्हाध्यक्षा सुनंदा धोबे, शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी,

माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत उपस्थित होते.  आमदार वंजारी म्हणाले, देशात आणि राज्यात अत्यंत निराशाजनक वातावरण आहे. जनतेचे प्रश्न मोठय़ा प्रमाणात उभे आहेत. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागेल.

रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, त्यातून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि जिल्ह्यात, राज्यत, देशात काँग्रेस गतवैभव प्राप्त होईल.  भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुर्ण ताकदीने लढवायच्या आहेत. असेही आमदार वंजारी म्हणाले. यावेळी चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेसने कामाचा आढावा निरीक्षकांसमोर सादर केला.

त्यानंतर ते चंद्रपूर शहर तसेच तालुका, शहर तसेच ग्रामीण पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून सर्वांची मते जाणून घेतली. या बैठकीचा अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करणार आहेत.

खासदार धानोरकर यांनी व्यक्त केली नाराजी

काँग्रेस पक्षाची चंद्रपूर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या आर्णी विधानसभा मतदार संघात आढावा बैठक झाली. या बैठकीला या क्षेत्राच्या काँग्रेस खासदार या नात्याने मला निमंत्रण अपेक्षित होते. परंतु मला निमंत्रण दिले गेले नाही.  असे प्रकार योग्य नाही या शब्दात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली.

चंद्रपूर विधानसभा मतदार संघात ८४ हजार पेक्षा अधिक मते घेतलीं. मात्र निवडणूक काळात अनेक जण सकाळी काँग्रेस तर रात्री भाजप सोबत असल्याचे चित्र बघायला मिळाले. अशा पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी चंद्रपूर विधानसभा उमेदवार प्रवीण पडवेकर यांनी याप्रसंगी केली.

तर बल्लारपूरचे काँग्रेस उमेदवार संतोष सिंह रावत यांनीही बैठकीत नाराजीचा सूर आवळला. तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे व खासदार प्रतिभा धानोरकर यांनी समाज माध्यमावर काही व्यक्ती ट्रोल करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत त्याची संपूर्ण माहिती घ्या असे निर्देश दिले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना काँग्रेस पक्षाचे सर्व सेल बरखास्त केल्याचे सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.