चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३५८ पदांच्या भरतीप्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. याप्रकरणी आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, आदित्य नंदनवार आणि रोहन गुजेवार यांनी थेट नवी दिल्ली गाठून सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयात तक्रार दाखल केली.

बँकेतील भरती प्रक्रियेत मागासवर्गीयांचे (एससी, एसटी, ओबीसी व महिला) आरक्षण काढून टाकण्यात आले आहे. ३१ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांपैकी केवळ तीन जिल्ह्यांतील (चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ) उमेदवारांची निवड करण्यात आली. याशिवाय निवड झालेले उमेदवार बँकेशी संबंधित असल्याचेही उघड झाले आहे. या प्रक्रियेत कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचा आरोपही आपने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात आपच्या शिष्टमंडळाने ‘ईडी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिले. या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर आणि अपारदर्शक आहे. चंद्रपूरच्या सामान्य विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. भरतीप्रक्रियेची चौकशी आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच ठेवू. भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आंदोलन करू. पीडित बेरोजगारांनी आपशी संपर्क साधावा, असे आवाहन राईकवार यांनी केले आहे.