चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी लवकरच पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून निवडणुकीच्या तयारीचे निर्देश देत आवश्यक असलेल्या साहित्याची माहिती मागवली आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान सदस्य बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरच कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीचे संचलन करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे निवडणूक साहित्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे शपथपत्र, नामनिर्देशन पत्र, फार्म ए व बी, निवडून आलेल्या उमेदवाराला द्यावयाचे प्रमाणपत्र, बोटाला लावायची शाई, सुधारित पिंक पेपर सील, सुधारित ग्रीन पेपर सील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> नागपूरच्या सीताबर्डी भागात प्लॅस्टिक दुकानाला भीषण आग, लाखोंचं नुकसान

पोटनिवडणूक जाहीर झाल्यास आपल्याकडे पुनर्वापर करण्याजोगे निवडणूक साहित्य आहे किंवा नाही याबाबत तत्काळ माहिती देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी अ.अ. खोचरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना विचारणा केली असता, आयोगाचे पत्र मिळाले आहे. निवडणूक घेण्याची काय तयारी आहे हे आयोगाला लवकरच कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> भंडारा : आता ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले नाना पटोलेंचे बॅनर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महाविकास आघाडी निर्णय घेईल : अजित पवार

चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वरोरा येथे धानोरकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. लोकसभेची पोटनिवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. निवडणूक जाहीर झाल्यास महाविकास आघाडी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील, असेही ते म्हणाले. यानंतर अजित पवार व जयंत पाटील यांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष स्व. ॲड. मोरेश्वर टेंमुर्डे यांच्या घरी सांत्वन भेट दिली. ॲड. टेंभुर्डे यांचे २२ जानेवारीला हृदयविकाराने निधन झाले होते. यावेळी ॲड. टेंमुर्डे यांच्या पत्नी माया टेंमुर्डे, मुलगा जयंत टेंमुर्डे आधी उपस्थित होते.

हेही वाचा >>> लोकसभेचे पडघम : विरोधकांची जोरदार तयारी; शिवसेना ठाकरे गट मात्र अंतर्गत गटबाजीत अडकला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपसाठी पोटनिवडणूक अडचणीची!

पोटनिवडणुकीबाबत भाजपच्या गोटातही हालचाली सुरू झाल्या आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्यास उमेदवार कोण, अशा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. भाजपसाठी हा मुद्दा अढचणीचा ठरू शकतो. लोकसभेसाठी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नावे चर्चेत असली तरी सहानभुतीच्या लाटेवर होणारी ही निवडणूक भाजपचे हे दोन्ही नेते लढण्यास तयार आहेत काय, हा देखील प्रश्न आहे. या दोन्ही नेत्यांनी नकार दिल्यास इतर उमेदवारासाठीही ही पोटनिवडणूक सोपी नसेल. उमेदवारी मिळालीच आणि निवडणुकीत पराभव झाला तर भविष्यातील राजकारणाचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. काँग्रेसकडून जर विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली गेली तर सहानुभुतीच्या लाटेमुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यामुळे भाजपसाठी ही पोटनिवडणूक अडचणीचीच ठरण्याची चिन्हे आहे.