नागपूर : ओबीसी आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. नागपूरमध्ये ५० हजारांवर ओबीसींचा मोर्चा निघाला होता. त्यानंतर बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चा झाला. त्यात मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण संपल्याचा घंटानाद केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटलांवर आसूड ओढला. यानंतर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. नागपूरमध्ये झालेल्या आंदोलनात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका झाली. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपूरमध्ये रविवारी झालेल्या महाज्योतीच्या कार्यक्रमात विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
बावनकुळे म्हणाले की, काही लोकं फार नौटंकी करतात. हा राजकीय कार्यक्रम नाही, हे माहिती आहे. ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण आमच्या सरकारने वाचवले. ओबीसींचे २७ टक्के आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन केले. ५०० लोकांना माझ्यासकट कारागृहात टाकले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हे आरक्षण वाचवले. मला अभिमान आहे याचा. सर्वाेच्च न्यायालयात आपण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची बाजू मांडली.
फडणवीस हे ओबीसी आरक्षणाचे खरे शिल्पकार आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून २७ टक्के ओबीसींना उमेदवारी मिळणार आहे. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असेही बावनकुळे म्हणाले.
वारंवार मागण्या करायचे पण ओबीसी जनगणना कधीच झाली नाही. मात्र, मोदींच्या सरकारने हा निर्णय घेतला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी सांगितले की, फडणवीस असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही. किमान तायवाडेंचे तरी ऐकायला हवे होते. मोर्चा काढला. मोर्चा काढणाऱ्यांना सांगतो, २ सप्टेंबरचा शासन निर्णय ४ जिल्ह्यापुरता आहे. हैद्राबाद गॅजेटपूरता आहे. खऱ्या कुणबींना प्रमाणपत्र मिळणार आहे. मात्र, कांगावा करून महाराष्ट्र पेटवून उठवण्याचे काम या मोर्चाने केले. राजकारण करण्यासाठी हा मोर्चा होता. सरकारला बदनाम करण्याचे काम या मोर्चाने केले.
त्यांचा इतकाच उद्देश होता. मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणाार नाही हे स्पष्ट केले. फडणवीसांच्या काळात ओबीसींचे वसतिगृह झाले. वसतिगृहासाठी मसहूल खात्याच्या जागा देण्याचा निर्णयही आम्ही केला. ओबीसींना न्याय देण्याचे खरे काम फडणवीसांनीच केले, असेही बावनकुळे म्हणाले.
नेमके काय म्हणाले बावनकुळे
२ सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात नागपूरमध्ये निघालेला मोर्चा म्हणजे राजकीय नाटक होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही. ओबीसींचे खरे कैवारी हे फडणवीसच आहेत. कुणी कितीही राजकारण केले तरी ओबीसी समाज तुमच्या राजकारणाला बळी पडणार नाही. फडणवीस यांनी २०१४ ला मुख्यमंत्री झाल्यापासून प्रत्येकवेळी ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे फडणवीस हे ओबीसी आरक्षणाचे खरे शिल्पकार आहेत हे लक्षात ठेवाचे अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.