चंद्रपूर : तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यातून निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा करून जिल्ह्यातील राईस मिल मालकांकडून कोट्यावधीचा तांदूळ घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून गरीबांना देण्यात येणारा तांदूळ त्यांच्याकडून पून्हा खरेदी करायचा आणि तो राईस मिल मालकांना विक्री करायचा असे मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रीय आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी बिनबा गेट येथे ताज एंटरप्राईजेस समोर ३ लाख ९० हजाराचा १३ टन तांदूळ जप्त केला आहे. विशेष म्हणजे हा तांदूळ वडसा येथे जात होता अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपूर व लगतचा गडचिरोली जिल्हा हा तांदूळ तस्करीचे मुख्य केंद्र बनला आहे. तेलंगणा व आंध्र प्रदेश हे स्वस्त तांदळासाठी प्रसिध्द दोन्ही राज्य या जिल्ह्यांच्या सिमांना लागून आहे. तेथूनच हा स्वस्त तांदूळ या जिल्ह्यात येत आहे. त्या माध्यमातून तस्करीचा हा गोरखधंदा येथे फोफावला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहमतनगर बिनबा गेट येथे वाहन क्रमांक (एम.एच. ३४ बी.झेड. २४२८) या वाहनातुन अवैधरीत्या तांदु‌ळाची वाहतुक होत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी रहमतनगर येथे ताज एंटरप्रायजेस समोर उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली असता त्यात १३ टन तांदुळ होता. ३० रूपये प्रमाणे एकूण ३ लाख ९० हजार रूपयाचा तांदूळ आणि टाटा कंपनीचा ट्रक किमत ४ लाख असे एकुन ७ लाख ९० हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहनचालक सुरेश कमलाप्रसाद तिवारी (५०) रा. अष्टभूजा चौक व काशीद मोहम्मद जलील शेख (३३) रा.हतेमतनगर याला पोलिसानी माहिती विचारताच त्याने ट्रकमध्ये तांदुळ असल्याचे सांगितले व त्यावेळी पोलिसांनी कागदपत्र मागितली. मात्र वाहन चालकाकडे तांदूळ साठ्याबाबत कुठलेही कागदपत्र नव्हते.

सदर तांदूळाचा साठा हा काशीद मोहम्मद जलील शेख यांच्या गोदामधुन घेतला व वडसा येथे घेवुन जात असल्याबाबत वाहनचालकाने पोलिसांना सांगितले. त्यावेळी बाजुलाच असलेल्या काशीद यांच्या गोदामाची पाहणी केली असता गोदाम कुलुपबंद अवस्थेत दिसुन आले. दरम्यान हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानात गरीबांना विकलेला आहे अशी माहिती आता समोर येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातून धान खरेदी करायचे, त्या धानाची भरडाई करायची आणि चांगला तांदूळ खुल्या बाजारात विकून निकृष्ठ तांदूळ पुरवठा विभागाला द्यायचा असा हा गोरखधंदा जिल्ह्यातील राईस मिलर करीत आहेत. मागील अनेक दिवसांपासून या जिल्ह्यात हा गोरखधंदा सुरू आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा मार्केटींग अधिकारी व्ही.एस.तिवाडे यांना या प्रकरणी नोटीस बजावून तत्काळ माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच नागभीड तालुक्यातील चांदतारा इंडियन स्टीम राईस इंडस्ट्रीज व गुप्ता राईस मिल एक्सपोर्ट या दोन राईस मिलमध्ये मुंबईच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात धात तफावत दिसून आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर आता स्वस्त धान्य दुकानात विक्री होणारा तांदूळ ट्रकमध्ये मिळाल्याने आणि हा ट्रक वडसा येथे जात असल्याचे चौकशीत समोर आल्याने तांदूळ घोटाळ्यात जिल्ह्यातील अनेक मोठे मासे सक्रीय असल्याचे समोर आले आहे. दरम्यान यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर यांना विचारले असता, तांदूळ स्वस्त धान्य दुकानातील नाही असे सांगितले. तांदूळ कुठला आहे हे विचारले असता यावर त्यांनी व्हीसी सुरू आहे असे सांगत काहीही प्रक्रिया दिली नाही.