बुलढाणा : चिखली येथील तत्कालीन तहसीदार यांना सोन्याचे दागिने पाहिजे अशी बतावणी व सराफाच्या चालकाची फसवणूक करून दागिने लंपास करणाऱ्या ठगसेनास चिखली न्यायालयाने सश्रम कारावास व एक लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. खटल्याच्या पार्श्वभूमीनुसार फिर्यादी विठ्ठल हिम्मत गायकवाड (राहणार करणखेड ) हे चिखली येथील दिघेकर ज्वेलर्स चिखली चे मालक प्रकाश दिघेकर यांच्याकडे चालक म्हणून काम करीत होते. मागील ११ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपी शेख बाबू शेख छोटू मिया (राहणार रशीद टेकडी तालुका भोकर जिल्हा नांदेड) हा दुकानात आला. त्याने आपले नाव रमेश गायकवाड असल्याचे सांगून चिखली तहसीलदार साहेबांना सोन्याचे दागिने पाहिजे असे खोटे सांगून दिघेकर ज्वेलर्स मधून दागिने घेतले.
विठ्ठल गायकवाड यांच्यासह तहसील कार्यालय चिखली येथे गेला. चालका जवळील चार ग्रॅमच्या तीन सोन्याच्या अंगठ्या व सहा ग्रॅमच्या दोन सोन्याच्या गळ्यातील चैन असे एकूण दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढून घेऊन फसवणूक करून रिकामी थैली फिर्यादीच्या हातामध्ये देऊन पळून गेला. या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध ३७९,४२० भादवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन सिंह चव्हाण यांनी तपास करून आरोपीला अटक केली.आरोपी विरुद्ध चिखली न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.
न्यायालयात फिर्यादी व इतर महत्त्वाचे साक्षीदार यांचा पुरावा नोंदविण्यात आला. बारा साक्षीदार तपासण्यात आले. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी इरफान अली खान युसुफ अली खान यांनी आरोपीला कलम ३७९ भादवि नुसार १ सश्रम कारावास आणि कलम ४२० भादवी नुसार २ वर्ष ६ महिने सश्रम कारावास आणि १लाख रूपये दंड आणि दंड न भरल्यास पुन्हा ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. साक्षीदार प्रकाश दिघेकर यांना नुकसान भरपाई म्हणून आरोपीने त्यांना एक लाख रुपये द्यावेत असा आदेश केला आहे. सरकारी वकील म्हणून मोहम्मद बशीर मोहम्मद नसीर यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार गोरखनाथ राठोड यांनी मदत केली.