सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रत्येक विद्यार्थी धडपड करत असतो. अशात नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण यामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेल्या मुलीला चक्क २१४ गुण मिळाले आहेत. यावर अनेकांनी आक्षेप घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे. सुरू असलेल्या गोंधळामुळे तलाठी भरतीची ही परीक्षा रद्द होणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. जी मुलीगी पहिली आहे तिला २१४ गुण मिळाले आहेत. याच मुलीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये ५४ गुण होते. या दोन्ही परीक्षांमध्ये फक्त १४ दिवसांचा अवधी असताना हे कसे शक्य आहे? असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे.
हेही वाचा >>> प्रेमविवाहानंतर संसार तुटण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ, तीन हजार प्रेमीयुगुलांनी घेतली भरोसा सेलची मदत
तलाठी भरतीच्या या परीक्षेत मोठा घोटाळा होणार हे आम्ही आधीच सांगितले होते. यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात देखील याचिका केली आहे. यावेळी मोठी पेपर फुट देखील झाली, गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र कसलाही तपास न करता पेपर घेण्यात आले आहेत. सरकारने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केली आहे. त्यातच आता या संघटनेने तलाठी भरती संदर्भात मोठी माहिती आपल्या ट्विटरवर जाहीर केली आहे. लातूरमधील तलाठी घोटाळा बाबत धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. काही जिल्ह्यातील टॉपर मुले ज्यांना २०० पेक्षा अधिक गुण आहेत ते एकाच गावचे आहेत. शिवाय ते लातूर मधील एका परीक्षा केंद्र चालकाचे नातेवाईक असल्याचा व शिवाय वनरक्षक भरतीमध्येही हेच परीक्षा केंद्र देण्यात आले होते असा आरोप आहे. या सर्व प्रकारामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. असेच प्रकार प्रत्येक जिल्ह्यात झाले आहेत. हे फक्त उदाहरण आहेत. जर लातूरमधील केंद्रांची उच्चस्तरीय चौकशी झाली तर सर्व सत्य समोर येईल. गरिबांच्या होतकरू मुलांनी फक्त अभ्यासच करायचा का? सरकार डोळे उघडा आणि चौकशी करा सत्य समोर येईल अशी मागणीही समन्वय समितीने केली आहे.