गडचिरोली: आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे दक्षिण गडचिरोलीतील आलापल्ली ते सिरोंचा ३५३ सी या राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र चिखल झाल्याने दररोज तासंतास वाहतूक ठप्प पडत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा गडचिरोलीचे पालकमंत्री झाल्यानंतर आढावा बैठकीत या मार्गाचे बांधकाम तात्काळ सुरु करण्याची निर्देश दिले होते. मात्र, सहा वर्ष उलटल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

गेल्या सहा वर्षांपासून विविध कारणांनी बांधकाम रखडल्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी पुन्हा एकदा चर्चेत आहे. जिल्ह्यात आठवडाभरापासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचे ‘चिखल मार्गात’ रूपांतर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला जोडणारा व पुढे छत्तीसगड आणि तेलंगणाला जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग मागील सहा वर्षापासून खड्डेमय झाला आहे.

प्रवासाकरिता अडचण निर्माण झाल्यास तात्पुरती डागडुजी करण्यात येत होती. परंतु आता या मार्गावरून वाहन तर सोडा पायी चालणे देखील कठीण झाले आहे. मागील वर्षी तर पावसामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद होता. एसटी बसेस देखील बंद होत्या. त्यामुळे सिरोंचा तालुक्याला तेलंगणामार्गे जावे लागायचे. अजूनही खाजगी वाहने त्याच मार्गे प्रवास करीत आहे. गावातून तालुका मुख्यालयी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणे शक्य होत नाही.

कित्येक गंभीर आजारी रुग्ण उपचाराअभावी दगावली. अपघातामुळे सहा वर्षात जवळपास पन्नासहून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. इतकी भीषण परिस्थिती असतानादेखील या महामार्गाचे काम कुठे अडले या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे नाही. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांविरोधात विरोधात रोष व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हाच का विकास?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडीच वर्ष गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यांच्याच काळापासून हा मार्ग रखडला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकत्व घेतले. गडचिरोलीत लोह खनिजावर आधारित मोठमोठे उद्योग उभारून ‘स्टील सिटी’ बनवू अशी घोषणा केली. त्यानंतर मोठमोठ्या कंपन्या शेकडो कोटींची गुंतवणूक करीत आहे. पण या महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करणे प्रशासनाला शक्य होत नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. पण ते जिल्ह्यात येत नाही. त्यांच्याकडे या प्रश्नांसाठी वेळ नाही. अशी टीका काँग्रेसने केली आहे.