नागपूर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. शिवसेनेसाठी मुंबई महापालिका निवडणूक राजकीय अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाची आहे. तर भाजपला कोणत्याही परिस्थिती मुंबई महापालिकेपासून शिवसेनेला दूर ठेवायचे आहे. त्यासाठी वेगवेगळे डावपेच आखण्यात येत आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील, अशी माध्यमात चर्चा जोरात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पंचतारांकित हॉटेलात राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर काही दिवसात महाराष्ट्रात इयत्ता पहिली पासून तृतीय भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्यात आला आहे.
याबाबत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, हिंदी भाषेचा मुद्दा देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांची स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मॅच फिक्सिंग आहे. राज्यात चालेला भष्ट्राचार, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, वाढलेली महागाई, लाडक्या बहिणींना देण्यास पैसा नसणे आदी मुद्दे चर्चेले जाऊ नये म्हणून मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण करून मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न या दोघांचा आहे, असेही पटोले म्हणाले.
पटोले नागपूर पत्रकार क्लब येथे शुक्रवारी बोलत होते.
मतांची चोरी लपवण्यासाठी नियमात बदल
मतांची चोरी लपावी म्हणून सीसीटीव्ही फुटेज उमेदवारांना उपलब्ध करून देणारा निवडणूक आयोगाच्या नियम क्रमांक ९३ मध्ये बदल करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून ४५ दिवसांनंतर निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण फुटेज नष्ट करण्याचे निर्देश दिले आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
ते म्हणाले, हरियाणा राज्यातील निवडणुकीत गडबड झाल्याचे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज संबंधितांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे मतांची चोरी उघडकीस येईल म्हणून ही बाब निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला कळवली. उच्च न्यायालयाच्या निकालास ४८ तास होत नाही तोच केंद्र सरकारने नियम क्रमांक ९३ मध्ये बदल केला.
केंद्र सरकारने निवडणूक आचारसंहितेत बदल करून निवडणुकीची काही कागदपत्रे सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कॅमेरा आणि वेबकास्टींग फुटेज सार्वजनिक करण्यास मनाई करण्यात येत आहे. अशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील सरकार आणि निवडणूक आयोगाने लोकशाहीची थट्टा चालवली आहे. मतांची चोरी करायची आणि ती लपवण्याची व्यवस्था केली आहे, असेही ते म्हणाले.