लोकसत्ता टीम

वर्धा : काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात वर्धा जिल्ह्यात एकमेव उमेदवार जाहीर झाले. माजी मंत्री व देवळीचे आमदार रणजित कांबळे हे आता लढत देण्यास परत सज्ज झाले आहे. १९९९ पासून ते आमदार आहेत. आमदारकीची २५ वर्ष त्यांनी पूर्ण केलीत. सलग पाच वेळा निवडून आलेल्या कांबळे यांनी आता सहाव्यांदा संधी घेतली. विदर्भातील ते काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार ठरतात.

यापूर्वी त्यांचा एकट्याच अर्ज काँग्रेसकडून देवळी विधानसभा मतदारसंघसाठी असायचा. यावेळी मात्र माजी महिला प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी अर्ज सादर करीत चांगलीच खळबळ उडवून दिली होती. माजी राज्यपाल दिवंगत प्रभाताई राव यांच्या त्या कन्या तर कांबळे हे भाचे. टोकस व कांबळे हे मावस भाऊबहीण. मात्र दोघात चांगलेच राजकीय वितुष्ट आले आहे. ही आपल्या आईची गादी. ती आता परत मिळावी, असा सूर टोकस समर्थकांचा राहला. टोकस या फार पूर्वी वर्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिल्यात. १९९९ ला लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रच झाल्या होत्या. प्रभाताई या काँग्रेसच्या वर्धा लोकसभा मतदारसंघात उमेदवार ठरल्या. त्यावेळी प्रश्न उद्भवला. आई व मुलगी एकाच वेळी उमेदवार कशा राहणार. म्हणून देवळीत सातत्याने आमदार राहलेल्या प्रभाताईंनी हा विधानसभा मतदारसंघ भाचा रणजित कांबळे यांच्याकडे सोपविला.

आणखी वाचा-मूर्तिजापूरमध्ये राष्ट्रवादीकडून सम्राट डोंगरदिवेंना उमेदवारी, पक्षात नव्याने आलेल्यांना संधी

चारूलता मग विवाहानंतर दिल्लीत स्थिरावल्या. त्यावेळी रोहणी गावचे सरपंच असलेले कांबळे हे आमदार बनले. त्यानंतर मग त्यांनी मागे वळून पाहलेच नाही. या काळात प्रभाताई यांचा दिल्लीत चांगलाच दबदबा निर्माण झाला होता. त्या प्रभावातून मग कांबळे यांना खणीकर्म महामंडळाचे अध्यक्षपद लाभले. तसेच पुढे ते विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पण झाले. या काळात राजकारणात मागे पडलेल्या टोकस मग महिला काँग्रेसच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्या.

आणखी वाचा-अहेरीत पिता-पुत्रीत थेट लढत; शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१४ मध्ये घोषित लोकसभा निवडणुकीत पक्षाने पक्षांतर्गत निवडणूक घेत उमेदवार ठरविण्याचा प्रयोग केला होता. त्यात चारूलता टोकस विरुद्ध सागर मेघे असा सामना झाला. टोकस पराभूत झाल्यात तर सागर मेघे हे काँग्रेसचे उमेदवार ठरले. पुढे २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चारूलता टोकस यांना वर्धा मतदारसंघातून संधी दिली. पण त्या मोदी लाटेत पराभूत झाल्यात. पुढे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्या फारश्या सक्रिय दिसल्या नाहीत. पण यावेळी त्यांनी आईचे वर्चस्व राहलेल्या व आता भावाने वर्चस्व राखलेल्या देवळी मतदारसंघवार नव्याने दावा केला. पण दिग्गज झालेल्या कांबळे विरोधात पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचे नाकारले.