लोकसत्ता टीम

नागपूर : विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाही, अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदान करु दिले नाही, असे टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. यासंदर्भातील पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर टाकली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मारकडवाडीमध्ये प्रशासन अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे वागले, त्यामुळे ईव्हीएम आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते अधिक गडद झाले आहे. ‘कर नाही तर डर कशाला?’ याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पडू द्यायला हवे होते, पण भाजपा सरकारच्या काळात सर्व सरकारी यंत्रणाच दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी त्यांना ‘वरून’ आलेल्या आदेशाची फक्त अंमलबजावणी केली. मारकडवाडीत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचाच प्रकार झाला आहे आणि हाच लोकशाही व संविधानाचा खून आहे.

आणखी वाचा-यवतमाळ : अजब न्याय! शेतकऱ्यांचा माल बाहेर अन् व्यापाऱ्यांचा मात्र…

विधानसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत. काँग्रेस पक्षानेही सातत्याने निवडणुकीतील गैरप्रकाराच्या तक्रारी केल्या पण निवडणूक आयोग ‘कुंभकर्णी’ झोपेतून जागे झाले नाही. निवडणूक आयोग आता फक्त नावालाच स्वायत्त संस्था उरली असून आज ते भाजपाच्या हाताखालचे कठपुतली बाहुले झाले आहे का? असा प्रश्न जनता विचारत आहे. मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्ष या लढाईत मारकडवाडीच्या ग्रामस्थांसोबत आहे. या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रुपांतर होऊन हुकूमशाही हरेल व लोकशाहीचाच विजय होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा-पोलीस दलात इतकी पदे रिक्त, महिला पोलिसांच्या पदांचाही …

निवडणूक आयोगाचे बिंग फुट नये म्हणूनच मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव केला काय, असा सवाल पटोलेंनी केला असून पोलिसांच्या दडपशाहीने मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाही व संविधानाचा खूनच आहे. लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या लढाईला काँग्रेसचा पाठिंबा आहे, असेही पटोले म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर मारकडवाडीत मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला प्रशासन का घाबरले? असा सवाल विचारत निवडणूक आयोगाचे बिंग फुटेल म्हणूनच गावकऱ्यांना मतपत्रिकेवर मतदान करु दिले नाही का?, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.