नागपूर: रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी होतांना दिसून येत आहे. महाविकास आघाडीत ही जागा कॉंग्रेसला सुटलेली असताना काल शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे यांनी आणि आज काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी अर्ज दाखल केला आहे.

काँग्रेसने रामटेक लोकसभा मतदार संघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला आहे. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून लढलेले प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये हे बर्वे यांना उमेदवारी पक्षाने दिल्याने नाराज झाले आहेत. त्यांनी ही निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल आहे.

हेही वाचा >>>‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….

किशोर गजभिये यांनी २०१९ मध्ये ४,७०,३४३ मते घेतली होती. यावेळीही आपल्याला उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु रश्मी बर्वे या काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरल्या. त्यामुळे त्यांच्या पक्षाने डावलल्याची भावना आहे. पण, किशोर गजभिये यांनी “डमी”अर्ज असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (ठाकरे) याचे पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे यांनी देखील रामटकेसाठी अर्ज दाखल केला आहे. मागील निवडणुकीत ही जागा शिवसेने जिंकली होती. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. पक्षाने काँग्रेससाठी ही जागा सोडायला नको होती, असे सुरेख साखरे यांनी म्हटले आहे.