नागपूर: राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करीत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करणारा कथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला असून पुढील सुनावणी येत्या १७ होणार आहे. कोरटकरने स्वत: न्यायालयात हजर राहण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायालयाने पोलिसांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे कोरटकरला १७ तारखेपर्यंत अभय मिळाले.

 संपूर्ण महाराष्ट्रातून कोरटकरविरुद्ध आंदोलने होत असून त्याला अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. राजकीय नेत्यांच्या छत्रछायेत वावरणारा कोरटकर पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. यापूर्वी, कोरटकरच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. कोरटकरचा जामीन अर्ज रद्द व्हावा, अशी विनंती अर्ज गेल्या गुरुवारी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता.

कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी कोल्हापूर पोलीसांनी दाखल केलेला अर्ज रद्द करत असल्याचे बुधवारी सांगितले. याबाबत त्यांनी सरकारी पक्षाला अर्ज रद्द करण्याचे कारणही स्पष्ट केले. न्यायाधीशांनी कोणत्या कारणास्तव अर्ज निकाली काढला याबाबत माहिती देताना जिल्हा सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल म्हणाले, कायद्यातील दुरुस्तीमुळे भारतीय न्याय संहितानुसार अटकपूर्व जामीन असणाऱ्या आणि संवेदनशिल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती असेल तर अशा गुन्ह्यातील संशयीत आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात हजर न राहता ‘व्हीसी’व्दारे आपले म्हणणे मांडता येते. त्यामुळेच पोलीसांचा अर्ज फेटाळला आहे.

 १७ मार्चला सोमवारी आरोपी प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्याला अटक करता येत नाही. कोरटकरचे आवाजाचे नमूने घ्यायचे असल्याने तसेच त्याने पोलिसात हजर केलेल्या मोबाईलमधील ‘डाटा डिलीट’ केलेला असल्याने पोलिसांनी कोरटकर न्यायालयात हजर राहावा अशी विनंती केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळल्याने पोलिसांना ‘सीडीआर’ व इतर साधनांचा वापर करून कोरटकर प्रकरणाचा तपास करावा लागणार आहे. बुधवारी सुनावणी वेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, प्रजासत्ताक पक्षाचे दिलीप देसाई, युवा सेनेचे अध्यक्ष हर्षल सूर्वे व इतर पदाधिकारी हजर होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे नेमके प्रकरण

कोल्हापुरातील रहिवाशी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच ‘छावा’ चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली. याबाबत सावंत यांनी फोनवरुन झालेला संवाद फेसबुकवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ‘जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा,’ असे म्हणत प्रशांत कोरटकरने सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.