लोकसत्ता टीम

चंद्रपूर : ‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि कार्यालय अधीक्षकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला. या कारवाईने चंद्रपुरात मोठी खळबळ उडाली आहे. अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील (५४), दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे (३४), कार्यालय अधीक्षक अभय बबनराव खताळ (५३) अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

घुग्घुस येथील गोदावरी बार अँड रेस्टॉरंटच्या संचालकांनी ‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर येथे अर्ज सादर केला होता. त्यानंतर अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे यांनी परवाना देण्यासाठी टाळाटाळ केली. दुय्यम निरीक्षक खारोडे यांनी, बिअर शॉपीचा परवाना मंजूर करून देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. गोदावरी बार अँड रेस्टॉरंटच्या संचालकाने २५ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली. त्यावरून पडताळणी कारवाई करण्यात आली. आज सापळा रचण्यात आला.

आणखी वाचा-मुलीच्या उपचाराच्या खर्चाला कंटाळून पित्याची तलावात उडी; वेळीच दोन पोलिसांनी…

दुय्यम निरीक्षक खारोडे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय, चंद्रपूर येथे कार्यालय अधीक्षक खताळ यांच्यामार्फत तडजोडीनुसार एक लाख रुपयांची लाच स्वीकारली. खारोडे आणि अधीक्षक संजय पाटील यांच्या फोनवरून पडताळणी केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे, कार्यालय अधीक्षक अभय खताळ या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील मूळचे कोल्हापूरचे रहिवासी आहेत. ते सध्या सुट्टीवर असून कोल्हापूरला गेले आहेत. त्यांनाही ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नरेश नन्नावरे, हिवराज नेवारे, संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम यांच्या पथकाने केली.