‘उपराजधानीतील वाढत्या गुन्हेगारीचा विषय वारंवार उकरून काढत या शहराला बदनाम कराल, तर खबरदार’ असा दम कुण्या सामान्य व्यक्तीने दिलेला नाही. राज्याच्या प्रमुखाने केलेले हे वक्तव्य आहे. प्रमुखाच्या या वक्तव्यामुळे बदनामीची व्याख्या नव्याने करण्याची गरज निर्माण झाली आहे. पक्षात मानाचे स्थान भूषवणाऱ्या, पण गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांचा अशा पद्धतीने बचाव करता येऊ शकतो, हे या प्रमुखाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्हेगारीत घट झाली, असा दावा माध्यम व राज्यप्रमुखाने करायचा आणि नंतरच्या २४ तासात सलग सात खून पडायचे व गुन्हेगारीची तुलना करणारा तक्ताच बदलून जावा, हे घडवून आणण्याची किमया फक्त हेच शहर करू शकते. येथील ५५० गुंड त्यासाठी सक्षम आहेत. दुर्दैवाने, विरोधक या गुन्हेगारीवरून राज्यप्रमुखाला धारेवर धरत नाहीत. त्याच्या आडून प्रमुखांच्या समर्थकांनी केलेल्या कारवाया विरोधकांना जनतेच्या नजरेत आणून द्यायच्या असतात. राज्यप्रमुखाला या आरोपातील मेख कळते म्हणूनच मग ते शहराला बदनाम करण्याची भाषा बोलू लागतात.
आता या शहराला खरोखर कोण बदनाम करत आहेत? विरोधक की राज्यप्रमुखांचे समर्थक?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राज्याचे प्रमुख सुसंस्कृत आहेत, उच्चशिक्षित आहेत. कोणतेही आव्हान पेलण्याची क्षमता त्यांनी एव्हाना सिद्ध केली आहे. मात्र, त्यांच्या भोवतीचा गोतावळा असंगांनी भरलेला आहे. असंगांशी संग करू नये, अशी शिकवण कधीकाळी संतांनी दिली होती. त्याच शिकवणीचे पाठ बडवत प्रमुख मोठे झाले आणि राजकारणात आले. येथे त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. त्यातील मोठी तडजोड असंगांशी संग ही आहे. हे समर्थक पोलीस ठाण्यात धुडगूस घालतात. त्यांचे बगलबच्चे आठवडय़ाला एक याप्रमाणे मारामारी करतात. या मारामारीत कधी खून पाडला जातो. हे समर्थक रुग्णालयात घुसतात. आम्ही म्हणू तशीच खरेदी झाली पाहिजे, असा आग्रह धरून तोडफोड करतात. हेच समर्थक बंदी असलेली बैलाची झुंज लावतात. त्यावर जुगार खेळतात. हेच समर्थक कुणाचा भूखंड खाली करून देण्याची सुपारी घेतात, त्यासाठी राडा करतात. कुठली झोपडपट्टी उठवतात, त्याचेही कंत्राट घेतात. समर्थकांच्या या कृत्यांमुळे उपराजधानीची बदनामी अजिबात होत नाही, असा राज्यप्रमुखाचा दावा आहे. विरोधकांनी हे मुद्दे उकरून काढले की, मग बदनामी सुरू होते, असे या प्रमुखाला म्हणायचे आहे. बदनामी ही सुद्धा व्यक्तिसापेक्ष असल्याचे या प्रमुखांनी त्यांच्या विधानातून दाखवून दिले आहे. या समर्थकांना अशी कृत्ये करण्यापासून रोखू, असे ते म्हणत नाहीत. तशी समज खासगीतही कधी देताना दिसत नाहीत. आपण सत्तेत आहोत, याचे भान ठेवा, असा सल्लाही या प्रमुखांनी कधी दिल्याचे स्मरत नाही. उलट, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना ते या समर्थकांचा बचाव करतात, पण त्याचा संबंध शहराच्या बदनामीशी जोडतात तेव्हा हसावे की रडावे, हेच अनेकांना उमगत नाही. सत्ता हे जबाबदारीने सांभाळण्याचे साधन आहे, याचे भान सुटले की, समर्थक असे सैराट होतात. त्यांना प्रमुखाने वठणीवर आणायचे असते. ते सोडून उगीच बदनामीचा कांगावा करणे हे पळपुटेपणाचे लक्षण नव्हे काय? विरोधकांचे सोडा, ते तर आरोप करतच राहणार, पण या समर्थकांच्या धुडगुसामुळे उपराजधानीची बदनामी होते, त्याचे काय?, या प्रश्नाचे उत्तर हे प्रमुख का देत नाहीत? या समर्थकांनी केलेल्या कारवायांचा संबंध माझ्याशी जोडू नका, पोलिसांना काय करायचे ते बघून घेतील, असा साळसूदपणाचा आव हे प्रमुख आणतात. पोलिसांच्या कामात आपण हस्तक्षेप करत नाही, असेच यातून त्यांना सुचवायचे असते.
प्रत्यक्षात तशी स्थिती आहे का, या प्रश्नाचा शोध घेतला की, साऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. रुग्णालयात घुसणारे समर्थक ज्याच्या नेतृत्वाखाली जातात, त्याच्यावरच गुन्हा दाखल होत नाही. पोलीस ठाण्याच्या आवारात जे समर्थक धुडगूस घालतात त्यांना मोकळे सोडले जाते. या समर्थकांचा पोलिसांकडून होणारा बचाव बघून तक्रारकर्त्यांला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो. सीआयडी चौकशीचे आदेश निघतात, पण ती चौकशीच केली जात नाही. हे सुशासनाचे लक्षण कसे समजायचे, हे या प्रमुखांकडून एकदा स्पष्ट होणे गरजेचे आहे. निष्पक्षतेचा वसा सांगणे वेगळे व तो आचरणात आणणे वेगळे. हे दोन्ही न करता केवळ आव आणण्याचा हा प्रकार या प्रमुखाला शोभून दिसत नाही. या प्रमुखाच्या पक्षात सारेच वाईट आहेत, असे नाही. अनेक सज्जनांनी हा पक्ष भरलेला आहे. निव्र्याज हसू तोंडावर आणत राज्य कारभार नेटाने पुढे नेणारे प्रमुख सुद्धा सज्जनच आहेत. मात्र, काही दुर्जन, तर काही सत्तेची मस्ती अंगात आलेले समर्थक त्यांच्या कारवायांनी पक्षाला पर्यायाने सत्तेला बदनाम करत आहेत, ही वस्तुस्थिती लपवून ठेवत शहराची बदनामी करू नका, असा शहाजोगपणाचा सल्ला हे प्रमुख देतात तेव्हा अनेकांना हसायला येते. केवळ काही दुर्जन समर्थकांसाठी उगीच शहराच्या बदनामीचा मुद्दा उपस्थित करून तमाम सज्जन नागपूरकरांना त्यात कशाला ओढता, असा प्रश्न या प्रमुखांना विचारण्याची वेळ आता आली आहे. या शहरात गुन्हेगारी आहे. त्याला कारणेही वेगवेगळी आहेत. त्यावर या प्रमुखांनी जरूर उपाय योजावेत, पण विरोधकांच्या माऱ्यातून वाचायचे असेल, तर या गुन्हेगारीला हातभार लावणाऱ्या समर्थकांना आधी आवरावे आणि हे करताना तमाम नागपूरकरांचा अपमान झाला, अशा थाटात बोलणे टाळावे यातच हित आहे अन्यथा, सत्ता ही क्षणभंगूर असते, याची जाणीव लवकर व्हायला वेळ लागणार नाही.
देवेंद्र गावंडे – devendra.gawande @expressindia.com