लोकसत्ता टीम
चंद्रपूर: “महाराष्ट्रातील कलावंतांनी अनेक सांस्कृतिक मंत्री बघितले. त्यांच्याशी संवादही झाला. पण हृदयापासून कलेवर आणि कलाकारांवर प्रेम करुन अत्यंत संवेदनशीलपणे या क्षेत्रातील प्रश्न समजून घेणारा, विचारपूस करणारा आणि कलावंतांना भरभरून देणारा सांस्कृतिक मंत्री पहिल्यांदा बघितला. राज्यातील ग्रामीण भागात असलेला तमाशा कलावंत सुधीर मुनगंटीवार यांचे शतशः आभारी राहील”, असे भावोद्गार विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त कलावंतांनी काढले. बोलताना त्यांच्या हृदयातील भाव डोळ्यांतून झळकत होता. स्थळ होते वाशी नवी मुंबई येथील सुभाषचंद्र बोस मैदान, रिमझिम पावसात रात्री नऊ वाजता.
तमाशा कलावंतांचा सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने गुरुवारी सन्मान करण्यात आला. या समारंभातच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुरस्कारप्राप्त तमाशा कलावंतांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. वातावरण अत्यंत भाऊक झाले असताना ढगातून रिमझिम पावसाचे थेंब टपकत होते तर या तमाशा कलावंतांच्या डोळ्यांतून अश्रुधारा..!
आणखी वाचा- पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘माझ्या गावातला ग्रामीण भागातील युवक खेळायला येतो का?’
स्वर्गीय गुलाबबाई संगमनेरकरांच्या मुलींना तर अश्रू अनावर झाले होते. भर पावसातही मुनगंटीवार यांनी उपस्थित राहून केलेला हा सन्मान कधीही विसरू शकणार नाही, नियतीला हा पुरस्कार मला त्यांच्या हस्तेच प्रदान व्हावा असे वाटत असेल म्हणून आजचा दिवस उजाडला, असे उदगार काढताना ज्येष्ठ कलावंत अताम्बर शिरढोणकर अत्यंत हळवे झाले होते.
तमाशा ही कला श्रीमंत व्हावी अशी आमची आर्त इच्छा आहे. या कलेला राजाश्रय मिळण्यासाठी आमची धडपड आहे असं सांगताना अखिल भारतीय लोककलावंत मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजी राजे जाधव म्हणाले मुनगंटीवार यांच्यासारखा प्रतिसाद देणारा आणि योग्य निर्णय घेणारा मंत्री राज्याला अनेक वर्षांनी लाभला आहे. राज्यातील तमाशा कलावंत हा क्षण विसरू शकणार नाहीत.
शासन लोककलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असे आणि राहिल अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. तसेच पुरस्कार प्राप्त कलावंतांना ‘अ’ वर्गाची निवृत्तीवेतनही देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.