गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. याच दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.

गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. यात हलक्या धानाचे क्षेत्र अधिक आहे. सध्या हलक्या धानाची कापणी व मळणी सुरू आहे; पण याच दरम्यान शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. सायंकाळी जवळपास तासभर झालेल्या पावसामुळे कापणी करून ठेवलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काही शेतकऱ्यांनी मळणीला सुरुवात केली होती. त्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसला. शेतातील बांधामध्ये पाणी साचल्याने आता तर धान कापणीची सुद्धा अडचण निर्माण झाली आहे. तर धानाच्या कडपा भिजल्याने मोठ्या प्रमाणात धान पाखड (लाल) होण्याची शक्यता बळावली आहे.

आधीच सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २३०९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याने ६३९८ शेतकरी बाधित झाले. या संकटातून सावरत असतानाच अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या व शेतातील उभ्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे खरिपातील धान शेती संकटात आली आहे. अवकाळीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

अवकाळी पावसामुळे धानपिकांचे नुकसान होत असून, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नसुद्धा निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. तर शेतकऱ्यांना वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? याची चिंता सतावत आहे. शनिवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दीड तास पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील कापणी केलेल्या आणि शेतातील उभ्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वाढली होती. सायंकाळी अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, सालेकसा, देवरी आणि आमगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. गोंदिया शहरही ढगांनी वेढलेले होते.

तिरोडा आणि गोरेगाव येथेही अशीच परिस्थिती होती. अवकाळी पावसामुळे शेतात साठवलेल्या कापणी केलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस कापणी थांबवण्यात आली आहे.पावसाचे पाणी शेतात साचल्यामुळे, चिखल तयार होण्याचा धोका वाढला आहे.यामुळे हलक्या जातीच्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय, फुलोऱ्यावर आलेली तूर पिक सध्या शेतात आहेच. आमगावमध्ये सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास पाऊस सुरू झाला आणि सुमारे एक तास सुरू राहिला. त्याचप्रमाणे अर्जुनी मोरगावमध्येही मुसळधार पाऊस पडला. दुपारी गोंदिया शहरात मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.देवरी तालुक्यातील देवरी, चिचगड, काकोडी भागात ४:३० वाजल्यापासून सुमारे एक तास मुसळधार पाऊस पडला.

तीन दिवसांचा येलो अलर्ट चा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, तीन दिवस किमान तापमानात कोणताही लक्षणीय बदल होणार नाही. २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान दररोज जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दररोज एक किंवा दोन ठिकाणी वादळ आणि पावसाचा येलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे.