लोकसत्ता टीम

गोंदिया : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. चंद्रपूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांबद्दल वापरलेल्या अपशब्दावरून त्यांनी टीका केली. हा भाजपाचा डीएनआय आहे, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ सुषमा अंधारे गोंदियात आल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. सुषमा अंधारे म्हणाल्या, ते जे काही बोलले त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही हा भाजपाचा डीएनए आहे. जो योग्यवेळी बाहेर आला. एकीकडे ‘मोदी का परिवार’ म्हणायचे, भारतात ‘बेटी बचाव-बेटी पढावʼ, महाराष्ट्रात ‘लेक लाडकीʼ या योजना राबवायच्या आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या, भारतातल्या लेकींबद्दल अपशब्द वापरायचे तसेच मणिपूरची घटना, हाथरस, उन्नाव येथील घटना तर कधी ऑलिम्पिक महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण, याकडे कानाडोळा करायचा. यावरून भाजपाची महिलांकडे पाहण्याची मूळ प्रवृत्ती समोर आली आहे.

आणखी वाचा-“भाजपाचे सरकार आले तर काहींना पाकिस्तानात पाठवले जाईल?” नितीन गडकरी याबाबत पंतप्रधान मोदींसमोर काय म्हणाले? वाचा…

“प्रफुल्ल पटेल यांनी विसरू नये की…”

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देवाण:गेवाण करून उमेदवार दिल्याचा आरोप केला होता. त्याला अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेस, शिवसेनेने तळागाळातील लोकांना संधी दिली आङे. प्रफुल्ल पटेल यांनी विसरू नये की त्यांची सुरुवात कुठून आणि कशी झाली. कुणालाही हीन लेखने, तुच्छ समझने ही भाजपाची संस्कृती आहे. कदाचित प्रफुल्ल पटेल हे भाजपाच्या संगतीला गेल्यामुळे त्यांनीही तुच्छ भाषेचा अवलंब केला असेल, असे अंधारे म्हणाल्या.

“संजय शिरसाट यांची भाऊ म्हणून घेण्याची योग्यता नाही”

नाना पटोले यांच्या अपघाताविषयी संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर त्या म्हणाल्या की, मुर्ख लोकांना आपण काय उत्तर द्यायचे. ते अत्यंत बोलघेवडे आहेत. ज्यांच्याकडे संस्कार नावाची गोष्ट नाही, महिलांशी कसे बोलायचे हे त्यांना कळत नाही, एखादी माय माऊली त्यांना भाऊ म्हणत असेल परंतु भाऊ म्हणवून घेण्याची त्यांची योग्यता नाही. अशा लोकांच्या बोलण्याकडे आपण फार लक्ष देऊ नये.

आणखी वाचा-रणसंग्राम लोकसभेचा : उत्तर नागपुरात जोरदार मोर्चेबांधणी; काँग्रेसचे प्राबल्य, भाजपही सज्ज!

“बच्चों को माफ कर देते है…”

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना कधीपासून मुल्लासेना झाली, असा प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, जाऊ दे, नारायण राणे यांच्या छोट्या पोरांकडे आपण लक्ष देऊ नये. छोट्या पोरांचे वडील कोकणात ऊभे राहिले तेव्हा आमचे विनायक राऊत त्यांना आरसा दाखवतीलच. “बाकी बच्चोको माफ कर देते है” अशा शब्दात त्यांनी नितेश राणेंची खिल्ली उडवली.

अशा आक्रस्ताळ्या बायकांबद्दल…

भाजपाच्या चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांना अय्याश, लफडेबाज माणूस म्हटल्याबद्दल सुषणा अंधारे म्हणाल्या की, माझे एक स्टँडर्ड आहे आणि ते मला मेंटेन करायचे आहे. त्यामुळे इतक्या खालच्या पातळीवर मी जाऊ शकत नाही. अशा आक्रस्ताळ्या बायकांबद्दल आपण बोलू नये, असे म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांच्यावरही निशाणा साधला.